मराठवाड्यातील पाणी मुद्यावर औरंगाबादचे आमदार एकवटले
मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवायचा असेल तर मराठवाड्यातील सगळ्याच आमदारांनी एकत्र यावं आणि या बैठकीला हजेरी लावावी, असं आवाहन यावेळी उपस्थित असलेल्या आमदारांनी केलं.
औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणी विषयावरुन आज औरंगाबादचे आमदार एकत्र आले. येत्या 22 तारखेला होणाऱ्या सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीबाबत सर्व आमदारांनी चर्चा केली. मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवायचा असेल तर मराठवाड्यातील सगळ्याच आमदारांनी एकत्र यावं आणि या बैठकीला हजेरी लावावी, असं आवाहन यावेळी उपस्थित असलेल्या आमदारांनी केलं.
मराठवाड्याचं पाणी हक्काचा आहे, मराठवाड्याची मागणी न्याय आहे आणि कायद्याला धरून आहे. त्यामुळे हे पाणी कुणीही अडवू शकत नाही, असेही यावेळी उपस्थित आमदारांनी स्पष्ट सांगितलं. मराठवाड्याची अडचण समजून घ्यावी, यात राजकारण करू नये आणि येथील लोकांचाही विचार करावा असे आवाहनही आमदारांनी केलं.
या बैठकीला आमदार प्रशांत बंब, अतुल सावे, काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार, इम्तियाज जलील, सतीश चव्हाण, भाऊसाहेब चिकटगावकर, हर्षवर्धन जाधव उपस्थित होते.
नाशिकचे काही लोकप्रतिनिधी मराठवाड्याला पाणी देण्यास विरोध करत आहेत. मात्र त्यांनीही कायदा समजून घ्यावा आणि उगाच विरोध करू नये, असे मत आमदारांनी व्यक्त केलं. नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी विरोध केला तर मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी सुद्धा हा विरोध मोडून काढतील, असा इशारा यावेळी आमदारांनी दिला.
जायकवाडी धरणाची सद्यस्थिती पाहता जायकवाडी धरणात 172 दशलक्ष घनमीटर पाण्याची तूट असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. त्यामुळे नगर, नाशिकच्या धरणातून जायकवाडी धरणात जवळपास सात टीएमसी पाणी सोडण्यात येईल. या निर्णयामुळे मराठवाडा विरुद्ध नगर, नाशिक असा वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, या बैठकीपूर्वीच नगर, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध दर्शवला आहे.
नगर, नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा आजचा पाणीसाठा
गंगापूर 88.67 %
दारणा 92.97%
मुकणे 73.09%
भंडारदरा 93.16 %
निळवंडे 85.59 %
मुळा 66.62%
करंजवन 93.89%
जायकवाडी धरण आज 36.62% टक्के पाणीसाठा आहे.
संबंधित बातम्या