Assembly session : विधिमंडळाच्या अधिवेशनाची तारीख बदलली, एक दिवसानं अधिवेशन ढकललं पुढे
विधानसभेचं अधिवेशन एक दिवसानं पुढे ढकलण्यात आलं आहे.अधिवेशन आता 3 आणि 4 जुलै रोजी होणार आहे.
Assembly session : विधानसभेच्या अधिवेशनाची तारीख बदलली आहे. विधानसभेचं अधिवेशन एक दिवसानं पुढे ढकलण्यात आलं आहे. शनिवारी आणि रविवारी म्हणजे 2 आणि 3 जुलैला होणारे अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं आहे. हे अधिवेशन आता 3 आणि 4 जुलै रोजी होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नव नियुक्त सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी हे अधिवेशन बोलावलं आहे. उद्यापासून हे अधिवेशन सुरु होणार होतं, पण आता अधिवेशनाची तारीख बदलण्यात आली आहे.
विधानसभा अध्यक्षपदासाठी राधाकृष्ण विखे पाटलांच्या नावाची चर्चा
विधानसभेचे अधिवेशन हे 3 आणि 4 जुलैला होणार आहे. या अधिवेशनात नवीन सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. त्यासाठी राज्यपाल कोश्यारी यांनी अधिवेशन बोलावले आहे. सुरुवातील 2 आणि 3 जुलैला अधिवेशन बोलावलं होतं. मात्र, आता हे अधिवेशन 3 आणि 4 जुलैला बोलावण्यात आलं आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्षपदासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका
दरम्यान, महाराष्ट्रातील सत्ता नाट्य संपले असले तरी दुसरीकडे कायदेशीर लढाई अद्याप संपली नाही. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यपालांनी रविवारी आणि सोमवारी मुख्यमंत्री शिंदे यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. या दरम्यानच विधानसभा अध्यक्षांची निवड देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईच्या याचिकेवर 11 जुलै रोजी होणारी सुनावणी आजच करावी अशी मागणी शिवसेनेकडून सु्प्रीम कोर्टात करण्यात आली आहे.
शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्रतेची नोटीस बजावली आहे. या नोटिशीविरोधात काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने 11 जुलै रोजी याबाबत पुढील सुनावणी करणार असल्याचे सांगितले. त्याशिवाय, अपात्रतेची नोटिस बजावलेल्या आमदारांना 12 जुलैपर्यंत नोटिशीला उत्तर देण्यास सांगितले होते.