विदर्भातील शेतकऱ्यांना सरकारनं हेक्टरी अनुदान जाहीर करावं, भाजपच्या 'या' नेत्याची मागणी
पावसाळी अधिवेशनात विदर्भातील शेतकऱ्यांना सरकारने हेक्टरी अनुदान जाहिर करावं, अशी मागणी भाजपचे ओबीसी आघाडीचे प्रदेश प्रभारी आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केली आहे.
Ashish Deshmukh : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विदर्भातील शेतकऱ्यांना सरकारने हेक्टरी अनुदान जाहिर करावं, अशी मागणी भाजपचे ओबीसी आघाडीचे प्रदेश प्रभारी आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी केली आहे. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी गेले दोन वर्ष संकटात आहेत. सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना जसा हेक्टरी बोनस दिला जातो त्याच धरतीवर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी मदत द्यावी, अशी मागणी देशमुखांनी केली आहे.
विदर्भात अनेक तालुक्यात पावसानं दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट आहे. त्यामुळं सरकारने विदर्भातील पाऊस नसलेल्या तालुक्यात क्लाऊड सिडिंग किंवा विमानाच्या मदतीनं कृत्रिम पाऊस पाडावा अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. आईसुद्धा बाळाला रडल्याशिवाय दूध पाजत नाही. म्हणून शेतकऱ्यांच्या रास्त मागणीला आम्ही सरकार दरबारी उचलून धरत असल्याचे ते म्हणाले. आज भाजपचे पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन पाठवणार आहेत.