(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये 'नियुक्त्या वॉर'; राष्ट्रवादीच्या बड्या मंत्र्याने केलेल्या नियुक्त्या काँग्रेसच्या मंत्र्यांने केल्या रद्द
राज्य शासनातील नियुक्त्यांवरुन महाविकास आघाडीतील दोन पक्ष, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे आमनेसामने आल्याचं चित्र आहे.
मुंबई: राज्यात तीन पक्षांनी स्थापन केलेल्या महाविकास आघाडीला जरी अडीच वर्षे पूर्ण झाली असली तरी त्यांच्यातील अंतर्गत वाद मात्र कमी होताना दिसत नाहीत. राष्ट्रवादीच्या एका बड्या मंत्र्याने केलेल्या नियुक्त्या या काँग्रेसमधील मंत्र्याने रद्द केल्याचं समोर आलं आहे.
काँग्रेसच्या अधिकारात असलेल्या अमृत संस्थेवर राष्ट्रवादी मंत्र्याच्या आदेशाने अधिकाऱ्यांनी परस्पर नियुक्ता केल्या होत्या. अखेर या सर्वच नियुक्त्या शासन निर्णय काढून रद्द करण्यात आल्या आहेत. बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या धर्तीवर राज्य सरकारने खुल्या प्रवर्गासाठी ‘अमृत‘ या संस्थेची स्थापना केली होती. मात्र या संस्थेवर राष्ट्रवादीच्या एका मोठ्या मंत्र्यांच्या आदेशाने अधिकाऱ्यांनी परस्पर नियुक्त्या केल्या होत्या. या नियुक्त्या करत असताना त्या विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोणतीच कल्पना दिली नसल्याची माहिती आहे. एवढंच नाही तर या नियुक्त्या करताना बहुजन कल्याण विभागांचे मंत्री म्हणून कोणतीच परवानगी घेतली नसल्याची ही माहिती समोर आली.
ज्यावेळी हा संपूर्ण प्रकार मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या लक्षात आला त्यावेळी या सर्व नियुक्त्या रद्द करण्याचा आदेश त्यांनी काढला. अमृत या संस्थेवर नेमण्यात आलेल्या निदर्शक, सल्लागार, निबंधक आणि काही राजकीय सल्लागार याची परस्पर नियुक्ती करण्यात आली होती. या प्रकरणी सर्व नियुक्त्या रद्द करुन सचिवांची ही तडकाफडकी बदली करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून लाखो रुपयांचा खर्च केल्याची माहीती समोर येतेय.
काय आहे हे प्रकरण?
राज्यातील सर्व समाजाला न्याय देण्यासाठी राज्य सरकारने बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या धर्तीवर खुल्या प्रवर्गासाठी अमृत संस्थेची स्थापना केली. खुल्या प्रवर्गातील विशेषतः ब्राह्मण समाजाच्या आंदोलनानंतर अमृत या संस्थेची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या संस्थेची स्थापना राज्य सरकारनं इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत केली. या संस्थेवर नियुक्त्या करताना संबंधित मंत्र्यांना कोणतीच विचारणा करण्यात आली नाही. तर राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याने शिफारस करून अधिकाऱ्यांना परस्पर नियुक्त्या करण्याचे आदेश दिले. या विभागाच्या मंत्र्यांना कोणतीच कल्पना न देता नियुक्ता तर केल्याच, मात्र कार्यालय आणि इतर कारभारही परस्पर करायला सुरुवात केली.
काही महिन्यानंतर मंत्री विजय वडेट्टीवार यांना संपूर्ण ही घटना कळली आणि त्यानंतर त्यांनी संस्थेच्या सर्व केलेल्या निविदा रद्द केल्या. महाविकास आघाडीच्या अधिकारात असलेल्या नियुक्त्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या आदेशाने परस्पर झाल्याने काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आहे.