(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dhule : मुलीच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या वृद्धाचा प्रकृती खालावल्याने मृत्यू
धुळ्यातील दुसाणे इथले रहिवासी असलेले सुधन्वा भदाणे आणि रंजना भदाणे हे आपल्या मुलीच्या न्याय हक्कासाठी उपोषणाला बसले होते.
धुळे : मुलीच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या वृद्धाचा प्रकृती खालावल्याने मृत्यू झाला. 14 मार्चपासून उपोषणाला बसलेले सुधन्वा भदाणे आणि त्यांच्या पत्नी रंजना भदाणे यांच्या आंदोलनाची प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. अखेर काल (20 मार्च) या वृद्ध दाम्पत्याची प्रकृती खालावली. त्यात सुधन्वा भदाणे यांचा मृत्यू झाला तर पत्नी रंजना भदाणे यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृत्यू झालेल्या वृद्धाचं वय 70 वर्षे असून त्यांच्या पत्नी पासष्टी पार आहेत.
धुळ्यातील दुसाणे इथले रहिवासी असलेले सुधन्वा भदाणे आणि रंजना भदाणे हे आपल्या मुलीच्या न्याय हक्कासाठी उपोषणाला बसले होते. भदाणे यांच्या मुलीचा रावसाहेब महाले यांच्याशी विवाह झाला होता. परंतु गेल्या 16 वर्षांपासून भदाणे यांच्या मुलीला तिच्या पतीने टाकले आहे. तसंच तिला घटस्फोट न देता परस्पर दुसऱ्या महिलेशी विवाह केल्याने वाद सुरु होता. शिवाज 16 वर्षांपासून या दाम्पत्याची आणि त्यांच्या मुलीची भेट झालेली नव्हती. या संदर्भात प्रशासनाकडून न्याय मिळावा म्हणून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात या वृद्ध दाम्पत्याचे उपोषण सुरु होतं.
14 मार्चपासून उपोषणाला बसलेल्या या दाम्पत्याची प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. आंदोलनादरम्यान दोघांचीही प्रकृती खालावली. त्यातच सुधन्वा भदाणे यांचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी रंजना भदाणे यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान आंदोलनादरम्यान या वृद्ध दाम्पत्याची विचारणा करण्यासाठी प्रशासनातील एकाही अधिकारी फिरकला नाही, असा आरोप भदाणे दाम्पत्याच्या नातेवाईकांनी केला आहे. आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कारवाईची मागणी करत प्रशासन आंदोलनाची दखल घेऊन न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा त्यांच्या नातेवाईकांनी घेतला आहे.
हे ही वाचा