(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SPPU Exam : आषाढी वारीमुळे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होणार
पालखीनिमित्त पुणे विद्यापीठाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे विद्यापीठाने पालखी दरम्यान असणाऱ्या परिक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परिक्षांचं वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाइटवर उपलब्ध केले जाईल.
SPPU Exam : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडत आहे. 12 जून आणि 13 जूनला पालखीचा पुण्यात मुक्काम आहे. या पालखीनिमित्त पुणे विद्यापीठाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे विद्यापीठाने पालखी दरम्यान असणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षांचं वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध केले जाईल. याशिवाय सासवड परिसरात 14 जून ते 16 जून दरम्यान होणाऱ्या पालखी मिरवणुकीमुळे नियमित परीक्षेला बसू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे.
विद्यापीठातील परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना या बदलांची माहिती दिली. मार्च 2023 च्या उन्हाळी सत्र परीक्षा 6 जून रोजी सुरु झाल्या आणि मूळ परीक्षेचे वेळापत्रक आधीच जाहीर केले होते. मात्र काही महाविद्यालयांच्या विनंतीचा विचार करुन विद्यापीठाने पुणे शहरातून पालखीचे प्रस्थान होण्याच्या अनुषंगाने 12 आणि 13 जून रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे वेळापत्रक पुन्हा प्रकाशित करण्यात येणार आहे.
परीक्षेसाठी अर्ज करावा लागणार!
सुधारित परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित केले जाईल जेणेकरुन विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात सगळी माहिती मिळणार आहे. पालखी मिरवणुकीमुळे जे विद्यार्थी नियमित परीक्षेला बसू शकत नाहीत ते विशेष परीक्षा देण्यास पात्र असतील. विशेष परीक्षेसाठी अर्ज करावा लागणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज त्यांच्या संबंधित महाविद्यालयांमार्फत सादर करणे आवश्यक आहे. कोणताही विद्यार्थी विशेष परीक्षा देण्याच्या संधीपासून वंचित राहू नये यासाठी परीक्षा विभागाकडून संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे आणि अर्जांवर प्रक्रिया करण्यात येणार आहे. विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येत असल्याने महविद्यालयाने देखील या संदर्भातील माहिती द्यावी, असं सांगण्यात आलं आहे.
आषाढी वारीसाठीवारकरी सज्ज झाले आहेत. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं तर आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. तुकाराम महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात झाला तर आज ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम आकुर्डीत असणार आहे. त्यानंतर पालख्या पुण्यात दाखल होईल. पुण्यातील नाना पेठेतील मंदिरात पालखीचा मुक्काम असेल मात्र त्यापूर्वी पुण्यातील नाना पेठ परिसरात पालखीच्या आगमनाची तयारी सुरु झाली आहे.
संबंधित बातमी-
Ashadhi wari 2023 : पालखीसाठी ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर अन् गाभारा नटला, रंगीबेरंगी फुलांची आरास