(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एखादी महिला केस घेऊन आली तर तिचं म्हणणं पूर्ण ऐकून घ्या, त्यांची सुरक्षा ही आपली जबाबदारी; दिलीप वळसे पाटलांचे पोलिसांना आवाहन
Mumbai Police: मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकाचं थीम साँग लाँच करण्यात आलं. त्यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिसांना हे आवाहन केलं.
मुंबई: एखादी महिला पोलिसांकडे तक्रार घेऊन आली तर तिचं म्हणणं पूर्ण ऐकून घ्या. राज्यातील महिलांची सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले. मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकाचे थीम सॉंग आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, "आज प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून निर्भया पथकाची सुरवात केली. त्या साठी सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना शुभेच्छा. निर्भया प्रकरणानंतर गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण वाढलेले आहे. साकीनाका प्रकरणात पोलिसांचा प्रतिसाद किती जलद होता हे आपण पाहिलं आहे. याच प्रकरणात आरोपीला अटक करत 18 दिवसात आरोपपत्र दाखल करण्यात आलं."
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पुढे म्हणाले, "महिलांवरील होणाऱ्या अत्याचारांच्या संख्येत वाढ होत आहे ही चिंता निर्माण करणारी बाब आहे. 80 ते 90 टक्के अपराध हे ओळखीच्या व्यक्तींकडून होतात. मग असं चित्र रंगवलं जातं की महिला सुरक्षित नाही आणि पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण केले जातात."
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, "शक्ती कायद्याच्या निमित्ताने माझ्या सहकाऱ्यांशी बोलताना महिला आणि पुरुष यांच्या मतात एक वाक्यता होती. पोलीस दलाला माझी विनंती आहे की, जी महिला एखादी केस घेऊन येते तेव्हा तीचं म्हणणं पूर्ण ऐकून घेतलं पाहिजे. छोट्या गुन्ह्यांकडे जर दुर्लक्ष झालं तर ते वाढत जातात. त्यावर वेळीच कारवाई केली तर मोठे गुन्हे घडण्यास आळा बसेल आणि पोलिसांचा ही ताण कमी होईल. महिला सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे. महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहेत ही भावना प्रत्येक महिलेला असायला हवी."
महाराष्ट्र हे महिलांचा सन्मान करणारं राज्य आहे. महिलांचं रक्षण करतं राज्य म्हणून महाराष्ट्राचं जगात नाव झालं पाहिजे. महिलांची सुरक्षा कशी करता येईल याचा महाराष्ट्राकडून आदर्श घालून दिला जाईल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
मुंबईत निर्भया पथकाचे थीम साँग लाँच करण्यात आलं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन उपस्थिती लावली. तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री अस्लम शेख आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची उपस्थिती होती. रोहित शेट्टी यांनी हे थीम साँग बनवलं असून त्याला अमिताभ बच्चन यांनी आवाज दिला आहे. त्याचबरोबर निर्भया पथकासाठी रोहित शेट्टीने 50 लाखांचा निधी दान केला आहे. त्याचबरोबर मुंबई पोलीस फाऊंडेशनच्या वतीने 11 लाखांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- महाराष्ट्राकडून महिलांच्या सुरक्षेचा आदर्श घालून दिला जाईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- CM Uddhav Thackeray: शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांची सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी; वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण
- Republic Day : ऐतिहासिक क्षण; स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमधील 'क्लॉक टॉवर'वर तिरंगा फडकला