महाराष्ट्राकडून महिलांच्या सुरक्षेचा आदर्श घालून दिला जाईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकाचं थिम साँग लाँच करण्यात आलं. यावेळी बोलताना, "महिलांची सुरक्षा कशी करता येईल याचा महाराष्ट्राकडून आदर्श घालून दिला जाईल असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
मुंबई : "महाराष्ट्र हे महिलांचा सन्मान करणारं राज्य आहे. महिलांचं रक्षण करतं राज्य म्हणून महाराष्ट्राचं जगात नाव झालं पाहिजे. महिलांची सुरक्षा कशी करता येईल याचा महाराष्ट्राकडून आदर्श घालून दिला जाईल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकाचं थिम साँग लाँच करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित होते. तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर प्रत्यक्ष उपस्थित होत्या. निर्भया पथकाचं हे थिम साँग रोहित शेट्टी यांनी बनवलं असून त्याला जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आवाज दिला आहे.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, "महिला आणि राज्याचं संरक्षण करणं हे सरकारचं पहिलं काम आहे आणि यामध्ये सरकार कोठेही कमी पडणार नाही. राज्यातील महिला आज सर्व क्षेत्रात पुढे येत आहेत. परंतु, एका बाजूने महिला प्रगतीपथावर घोडदौड करत असताना समाजातील महिला असहाय्य आहेत. एखादी घटना घडली तर काही दिवस गोंधळ होतो आणि नंतर पुन्हा परिस्थिती शांत होतं. ही परिस्थिती कोणामुळे आणि कशामुळे निर्माण होते इतकीच चर्चा होते. परंतु, पाशवी वृती कायमची मोढून काढली पाहिजे. गुन्हेगारांना वचक बसवण्याचं काम निर्भया पथक करत आहे. निर्भया पथकाला आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील"
विरोधकांना टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणास्तव बैठका, कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होत नसल्याने विरोधक वारंवार टीका करत आहेत. मुख्यमंत्र्यांची अभासी उपस्थिती अशी टीका विरोधकांकडून वारंवार केली जात आहे. विरोधकांच्या या टिकेला तशाच पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी आज उत्तर दिलं. "कार्यक्रमासाठीची उपस्थिती आभासी असली तरी पाठींबा प्रत्यक्ष आहे, असा टोला विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :