CET चा निकाल लागला, आता तरी GR काढा; मुलींच्या मोफत शिक्षणावरुन मनसे आक्रमक, ठाकरेंचं पत्र
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या घोषणेची आठवण करुन देत अमित ठाकरे यांनी पत्रद्वारे महत्त्वाची मागणी केली आहे.
मुंबई : दहावी, बारावी आणि पदवीधर परीक्षांचे निकाल लागले असून सध्या विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये प्रवेशांची लगबग पाहायल मिळत आहे. एकीकडे महाविद्यालयीन प्रवेशाला सुरुवात झाली असताना, दुसरीकडे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींच्या उच्च शिक्षणाबाबत मोठी घोषणा केली होती. मात्र, प्रवेश प्रक्रिया सुरु होऊनही मुलींना मोफत उच्च शिक्षणाच्या घोषणेवर कुठलीही अंमलबजावणी करण्यात आली आहे. यासंदर्भात ना शासन निर्णय जारी झाला, ना कुठला लेखी आदेश प्राप्त झाला. त्यामुळे, मंत्री महोदयांची घोषणा हवेतच विरल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच, मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून याबाबत विचारणा केली आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या घोषणेची आठवण करुन देत अमित ठाकरे यांनी पत्रद्वारे महत्त्वाची मागणी केली आहे. 9 फेब्रुवारी 2024 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे आयोजित एका कार्यक्रमात आपण ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना मेडिकल तसेच अभियांत्रिकी आणि अन्य 642 पेक्षा अधिक अभ्यासक्रमांचे शिक्षण मोफत दिले जाणार असल्याची घोषणा केली. या निर्णयामुळे गरीब घरातील मुलींसाठी उच्च शिक्षणाची दारे खुली झाली होती. इयत्ता बारावीनंतर अनेक हुशार मुलींना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते. त्यामुळे बारावीनंतर शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या संख्येतील घट पाहून सरकारने हा निर्णय घेतला होता. शासनाच्या या निर्णयानुसार अंदाजे 5300 उच्च महाविद्यालयांतर्गत 642 कोर्ससाठी 20 लाख मुलींकरिता 1800 कोटी रुपयांचा भार राज्य शासन उचलणार असल्याचे समजले, अशी आठवणच अमित ठाकरे यांनी मंत्री महोदयांना करुन दिली आहे.
यासंबंधीचा निर्णय यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या उपसमितीत घेण्यात आला असून, लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत हा निर्णय होईल आणि त्याची अंमलबजावणी सुरू होईल असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, अद्याप शासनाने या योजनेसंबंधी कोणताही शासन निर्णय (GR) प्रसिद्ध केलेला नाही. त्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींचे भवितव्य आजही अंधारात आहे. तसेच उच्च शिक्षण महाविद्यालयेसुद्धा याबाबत सरकारकडून कोणतीही सूचना किंवा आदेश न मिळाल्याने संभ्रमात आहेत, असे अमित ठाकरे यांनी पत्रातून म्हटले आहे.
सीईटीचा निकाला लागला, आता GR पारीत करा
देशभरात 16 जून 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता एमएचटी-सिएटी (MH -CET) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. अशा स्थितीत आपण तात्काळ कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन शासकीय आदेश (GR) पारित करावा, जेणेकरून उच्च शिक्षण घेण्याची दुर्दम्य इच्छा व अपेक्षा असणाऱ्या गरजू व गरीब मुलींचे भविष्य सुरक्षित होईल, अशी मागणीही अमित ठाकरेंनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI