Mahayuti Maharashtra Seat Sharing : शाहांनी मुंबईत चाचपणी करताच फडणवीसांसह भाजप नेत्यांनी दिल्ली गाठली; शिंदे-अजित पवार मागे हटेनात!
अमित शाह यांनी महाराष्ट्र दौऱ्यात जागावाटपात सबुरीचा सल्ला दिला असला, तरी शिंदे त्यांच्याकडील 13 जागांसाठी ठाम आहेत. दुसरीकडे, अजित पवार 9 जागांसाठी ठाम आहेत. भाजपने 32 जागांसाठी आग्रही आहे.
Mahayuti Maharashtra Seat Sharing : राज्यात महायुतीमध्ये जागावाटप (Mahayuti Maharashtra Seat Sharing) कळीचा मुद्दा झाला असून शिंदे गट आणि अजित पवार गट आपापल्या भूमिकेवर ठाम असून भाजपसाठी (BJP) स्थिती आव्हानात्मक झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी (Amit Shah) महाराष्ट्र दौऱ्यात जागावाटपात सबुरीचा सल्ला दिला असला, तरी शिंदे त्यांच्याकडील 13 जागांसाठी ठाम आहेत. दुसरीकडे, अजित पवार 9 जागांसाठी ठाम आहेत. भाजपने 32 जागांसाठी आग्रही असल्याने गुंता अधिक वाढला आहे.
राज्यातील भाजप नेते दिल्लीला रवाना
दरम्यान, आज (6 मार्च) अमित शाह यांच्या गाडीतून सीएम एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रवास केला. त्यांच्यासोबत दीपक केसरकर सुद्धा होते. याच गाडीत अजित पवार सुद्धा होते, अशी चर्चा आहे. अमित शाह यांचा जागावाटप संदर्भातील मुंबईतील चर्चेचा फेरा संपल्यानंतर भाजपच्या दिल्लीतील कोअर कमिटीच्या बैठकीसाठी राज्यातील भाजप नेते रवाना झाले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, चंद्रकांत पाटील आणि प्रविण दरेकर दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे जागा वाटपावर दिल्लीत अंतिम निर्णय होणार आहे. तत्पूर्वी, राष्ट्रवादीच्या बैठकीतून तातडीने सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले. पक्षांतर्गत चर्चेसाठी दोन्ही नेते गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. सत्तेत सहभागी होतांना जे आश्वासन आम्हाला देण्यात आलं होतं, ते पाळावे, अशी भूमिका राष्ट्रवादीची असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अजित पवार गट या दहा जागांवर ठाम
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस धाराशिव, परभणी, बुलढाणा, गडचिरोली, माढा, हिंगोली, बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या लोकसभेच्या किमान 10 जागांवर निवडणूक लढवण्यास ठाम आहे.
सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढवणार?
शरद पवार यांच्या कन्या आणि अजित पवारांच्या चुलत बहिणी सुप्रिया सुळे या बारामती मतदारसंघातून खासदार आहेत. अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार या जागा लढवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या पत्नी आहेत.
या जागांवर अडचण?
माढा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, मावळ, शिरूर, रायगड, मुंबई उत्तर पश्चिम, पालघर, संभाजी नगर, परभणी, यवतमाळ, शिर्डी आणि गडचिरोली अशा अनेक जागा आहेत ज्यावर तिन्ही पक्ष अडकले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या