(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar Uddhav Thackeray : मविआत मतभिन्नता; पवारांच्या भेटीसाठी ठाकरे सिल्वर ओकवर, बंद दाराआड सव्वा तास चर्चा
Sharad Pawar Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली.
Sharad Pawar Uddhav Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पवार यांचे निवास स्थान 'सिल्वर ओक'मध्ये भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाली. मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमधील मतभिन्नता समोर आली होती. या पार्श्वभूमीवर आजची बैठक महत्त्वाची समजली जात आहे. शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray Faction), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) स्वातंत्र्यवीर सावरकर ते ईव्हीएमसारख्या काही मुद्यांवर मतभिन्नता दिसून आली होती.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत उपस्थित होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित होत्या. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात विविध मुद्यांवर जवळपास सव्वा तास चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी म्हणून प्रामाणिकपणे लढूया या मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. जे संविधानाच्या विरोधात आहेत त्यांच्या विरोधात आपण लढायचं. त्याशिवाय, राज्यात आणि केंद्रात देखील एकी कायम राहिली पाहिजे या मतावरही दोन्ही पक्ष ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अदानी यांची संसदेच्या संयुक्त समितीमार्फत चौकशीची घेतलेली भूमिका, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रकरणी घेतलेली भूमिका, याबाबत तिन्ही पक्षात समन्वय साधला गेला नसल्याचे आतापर्यंत निदर्शनास आले होते. आता पुढे असं होऊ नये यासाठी बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाविकास आघाडीकडून राज्यभरात आता केंद्र सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारविरोधात राज्यभरात 'वज्रमुठ' सभेचे आयोजन केले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची पहिली सभा पार पडली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता, पुढील सभा नागपूरमध्ये असणार आहे. मात्र, त्यापूर्वीच महाविकास आघाडीत विविध मुद्यावरून वादाचे फटाके वाजण्यास सुरुवात झाली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतची भूमिका, अदानींची जेपीसी चौकशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री, ईव्हीएम आदी मुद्यांवर महाविकास आघाडीत मतभिन्नता नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झालीय का अशी चर्चा रंगू लागली होती.