आधी बाळासाहेब आणि आनंद दिघेंचे स्मरण मग शपथविधी, उद्धव ठाकरेंची परंपरा एकनाथ शिंदेंकडून कायम
महाराष्ट्रात शिंदेशाहीची सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Maharashtra New Govt. : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे एकनाथ शिंदेनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने घेतलेली शपथ हे आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरलं. एकनाथ शिंदेनी देखील आजच्या शपथविधीला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे स्मरण करत शपथ घेतली. एकनाथ शिंदे शपथविधीसाठी नेहमीप्रमाणे आपल्या पांढऱ्या रंगाच्या पोशाखात आले होते.
एरवी कोणतेही मंत्री शपथ घेताना राज्यपालांनी 'मी' म्हणून निर्देश दिल्यानंतर त्यापुढे त्यांचं नाव घेऊन शपथ घेत असतात. पण उद्धव ठाकरे यांनी असं न करता वेगळ्या प्रकारे शपथेची सुरुवात केली. त्याप्रमाणे एकनाथ शिंदेंनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे या शब्दांनी शपथेची सुरूवात केली. शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंनी स्वाक्षरी केली. शपथविधी अगोदर त्यांनी उपस्थित जनतेला नमस्कार करत सर्वांना अभिवादन केलं.
महाविकास आघाडीचा शपथविधी बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी त्यावेळी केला होता. महाविकास आघाडीतील प्रत्येक मंत्र्यांनी त्यावेळी शपथविधीअगोदर वेगळी नावे घेतली होती. शपथविधीविरोधात एकानं राज्यपालांकडे याचिका दाखल केली होती. तसंच त्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही केली होती. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
संबंधित बातम्या :
Eknath Shinde : बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मी एकनाथ शिंदे शपथ घेतो की...., एकनाथ शिंदे यांचा शपथविधी पार
Eknath Shinde : बाळासाहेबांच्या चरणी नतमस्तक, शपथविधीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डीपी बदलला