थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत पार्टी करताय.. एक दिवसाचा दारू पिण्याचा परवाना काढलाय का?
Beed : थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत पार्टी करणाऱ्या शौकिनांसाठी मोठी बातमी आहे. थर्टी फर्स्टच्या उत्साहावर विरजण पडू नये म्हणून 31 डिसेंबर रोजी पहाटे 1 वाजेपर्यंत मद्य विक्रीस परवानगी दिली आहे.
Beed : थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत पार्टी करणाऱ्या शौकिनांसाठी मोठी बातमी आहे. थर्टी फर्स्टच्या उत्साहावर विरजण पडू नये म्हणून 31 डिसेंबर रोजी पहाटे 1 वाजेपर्यंत मद्य विक्रीस परवानगी दिली आहे, तर महानगरांमध्ये पहाटे 5 वाजेपर्यंत ही परवानगी असणार आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात 31 डिसेंबर रोजी पहाटे 1 वाजेपर्यंत देशी, विदेशी मद्य विक्री व बिअर विक्री सुरू राहणार आहे. मात्र, दारू पिण्यासाठी एका दिवसाचा तात्पुरता परवाना काढणे आवश्यक आहे. मात्र, बीड जिल्ह्यात अशा प्रकारचा परवाना काढण्यासाठी कुणी उत्साही नसते. आतापर्यंत परवान्यासाठी एकही अर्ज आलेला नाही.
नववर्षाच्या स्वागतासाठी चालणाऱ्या पार्ट्यांना व त्यासाठी दारू दुकानांना राज्य सरकारने मध्यरात्री एक वाजेपर्यंत व महानगरांमध्ये पहाटे पाच वाजेपर्यंत सूट दिली आहे. त्यामुळे थर्टी फर्स्टला पहाटेपर्यंत चिअर्स करता येणार आहे. असे असले तरी दारू पिण्यासाठी एक दिवसाचा तात्पुरता परवाना आवश्यक असून बीड जिल्ह्यात एकानेही हा परवाना मिळावा यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे अर्ज केलेला नाही. त्यामुळे कारवाईत विनापरवाना दारू पिताना कुणी आढळले अथवा दारू पिऊन वाहन चालवताना आढळले तर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याला पोलिस कोठडीची हवा खावी लागणार आहे. तर मद्य प्राशनासाठीचा परवाना वाइन शॉप, बिअर शॉप, परमिट रूम येथेही मिळू शकतो. पाच रुपये शुल्क भरुन हा परवाना मिळतो. एक वर्षासाठी 100 रुपये तर आजीवन परवाना काढण्यासाठी १ ते दीड हजार रुपये लागतात. मात्र परवाना घेऊन मद्यप्राशन करणाऱ्यांची संख्या कमी आहे.
ड्रंक अँड ड्राइव्हवर लक्ष, 40 मशीन बीडमध्ये झाल्या उपलब्ध
बीड जिल्ह्यात दारू पिऊन वाहन चालवल्याने अपघात होऊ नयेत यासाठी 31 डिसेंबर रोजी ठिकठिकाणी नाकेबंदीदरम्यान तपासणी केली जाणार आहे. जिल्ह्यात प्रत्येक पोलिस ठाण्याला यासाठी मशीन दिलेल्या आहेत. वाहतूक शाखेकडेही मशीन आहेत. सुमारे 40 मशीन असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुदीराज यांनी दिली आहे.
अवैध दारू विक्रीवर पथकांचे लक्ष -
31 डिसेंबरच्या निमित्ताने अवैध दारू विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिस विभागाच्या पथकांचे लक्ष असणार आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने 616 गुन्हे नोंद करुन 596 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत 1 कोटी 24 लाख 34 हजार 634 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला आहे. आणि याच पार्श्वभूमीवर अवैध दारू विकणाऱ्या वर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची करडी नजर असणार आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक विश्वजित देशमुख यांनी दिली आहे.