(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाजपने दबाव टाकला, ईडीची भीती दाखवली, त्यानंतरच अशोक चव्हाणांचा राजीनामा; प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप
Praniti Shinde : वारंवार छापा आणि प्रेशर टाकून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. भाजपने ईडीची भीती दाखवल्याने अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे.
सोलापूर : माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत आमदारकीचा देखील राजीनामा दिला आहे. लवकरच त्यांचा भाजपमध्ये (BJP) प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान यावर आता अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत. तर, महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांची देखील यावर प्रतिक्रिया आली आहे. 'भाजपने ईडीची (ED) भीती दाखवल्याने अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला असल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर बोलतांना प्रणिती शिंदे म्हणाल्यात की, "वारंवार छापा आणि प्रेशर टाकून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. भाजपने ईडीची भीती दाखवल्याने अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेससाठी दुर्दैव गोष्ट आहे. पण ही भाजपचे तंत्रच आहे, प्रेशर आणि ब्लॅकमेल केलं जातं, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.
चव्हाण यांनी अतिशय हताश होऊन निर्णय घेतला...
अशोक चव्हाण यांनी सध्या काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे. ते पुढे काय करणार हे आता त्यांनी सांगितलेलं नाही. अशोक चव्हाण यांचे वडील मुख्यमंत्री होते. चव्हाण यांच्या पत्नी आमदार होत्या त्यांच्याशी देखील माझं बोलणं झालं. त्यांच्यात असलेलं स्ट्रेस लेव्हल आणि ज्या पद्धतीने भाजपकडून माइंड गेम खेळलं गेलं ते मी रेकॉर्डवर आणू शकतं नाही. पण अतिशय हताश होऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे. अजून ही काँग्रेसमधील अनेक नेत्यांना त्रास देणे सुरूच आहे, हे असलं राजकारण देशात पहिल्यांदाच होत आहे, असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत.
सुशील कुमार शिंदेंच्या भाजप प्रवेशच्या चर्चेवर प्रतिक्रिया...
विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून सुशील कुमार शिंदे हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. यावर देखील पुन्हा एकदा प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "आमच्या राजीनामा बाबतीत बोलल्या जाणाऱ्या गोष्टी या सगळ्या अफवा आहेत, मी आणि साहेबांनी (सुशील कुमार शिंदे) याबाबतीत स्पष्टीकरण दिलेला आहे," असे प्रणिती शिंदे म्हणाल्यात.
सुशील कुमार शिंदेंची प्रतिक्रिया
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर सुशील कुमार शिंदे यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. "ही कांही पहिलीच वेळ नाही, इंडिया शायनिंगच्या वेळेस ही मोठ्या संख्येने लोक गेले होते. जे राहिले ते जिद्दीने लढले आणि आमचं त्यावेळेस सरकार आलं. यावेळेस देखील असंच कांहीसं होईल," असेल सुशीलकुमार शिंदे म्हणाले.
विश्वजीत कदमांची प्रतिक्रिया...
यावर काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. “अशोक चव्हाण यांनी धक्कादायकपणाने दिलेल्या राजीनाम्यामुळे मला धक्का बसला आहे. मी माझा आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. जनतेला विश्वासात न घेता कुठला ही निर्णय घेणार नाही, असे विश्वजीत कदम म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :