Ajit Pawar: अजित पवारांचे पुण्यातील नियोजित दौरे रद्द, भाजपत जाण्याच्या चर्चांना वेग; मात्र कोणतेही नियोजित कार्यक्रम नव्हते, दादांचं स्पष्टीकरण
अजित पवारांच्या भाजप प्रवेशासंदर्भात अनेक चर्चांचं वादळ सुरु असताना शेवटच्या क्षणी शरद पवारांनी पुढाकार घेत, पक्षाचा नियोजित कार्यक्रमात उपस्थितीत लावणं, याला अनेक राजकीय अर्थ लागू शकतात.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्या अजित पवार (Ajit Pawar) केंद्र बिंदू ठरले आहेत. ते भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याची वारंवार चर्चा होत आहे आणि अजित पवार त्यावर वारंवार खुलासा देखील करत आहेत. सोमवारीही त्यांनी पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केल्याची चर्चा होती. तसंच आज आमदारांची बैठक बोलावल्याचीही जोरदार चर्चा होत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे अनेक आमदार मुंबईकडे निघाल्याची माहिती आहे. प्रत्येकजण आपल्या खाजगी कामासाठी निघाल्याचं सांगतायत. तर दुसऱ्या बाजूला भाजप आणि शिवसेना नेते त्यांच्या भाजप प्रवेशावर वक्तव्य करून अजित पवारांच्या चर्चेला खतपाणी घालत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवारांनी मोठं स्पष्टीकरण दिले आहे आज मी आमदारांची कोणताही बैठक बोलावली नाही. एवढंच नाही तर सोमवारी कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलंय. काहीही असो आपल्याच नावाची चर्चा वारंवार का होतेय? यांचं उत्तर अजित पवार कधी देणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
अजित पवार म्हणतात, माझे कुठलेही नियोजित कार्यक्रम नव्हते असं असतानाच पुरंदर हवेलीत राष्ट्रवादी काँग्रेसनं आयोजित केलेल्या युवक आणि शेतकरी मेळाव्याचं आमंत्रण पत्रिका समोर आली आहे. त्यामध्ये मार्गदर्शन म्हणून अजित पवार तर प्रमुख पाहुण्या खासदार सुप्रिया सुळे होत्या. पण, अजित पवारांनी कार्यक्रम रद्द केले, आणि त्यांच्या जागी कार्यक्रमात खुद्द शरद पवार उपस्थित झाले. त्यामुळेच अजित पवारांनी नकार दिला म्हणून शरद पवारांनी कार्यक्रमासाठी होकार दिला का? असा सवाल उपस्थित होत आहे. काल दिवसभर अजित पवारांच्या भाजप प्रवेशासंदर्भात अनेक चर्चांचं वादळ सुरु असताना शेवटच्या क्षणी शरद पवारांनी पुढाकार घेत, पक्षाचा नियोजित कार्यक्रमात उपस्थितीत लावणं, याला अनेक राजकीय अर्थ लागू शकतात.
मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 17, 2023
अजित पवारांसंदर्भातील चर्चांवर पृथ्वीराज चव्हाणांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांमध्ये मुख्यमंत्रिपदाचे गुण असून महाराष्ट्रात अनेक दिवस मिशन लोटस सुरु असल्याची प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
गेल्या आठवड्यातही अजित पवारांनी काही कार्यक्रम रद्द केले होते. तेव्हापासून अजित पवार भाजपसोबत जाणारअशा चर्चा सुरु झाल्या होत्या. रोखठोकमध्येही खुद्द शरद पवारांच्या वक्तव्यांचा आधार घेत पक्षांतरासाठी दबाव आहे असं स्पष्टपणे लिहिलं. पण, अजित पवारांनी भाजप प्रवेशाबाबत स्पष्टपणे नकार दिला.
स्वतःभोवती सतत संशयाचं वातावरण निर्माण करत राहणं हे शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिलाय . यामुळं राष्ट्रवादीच्या विश्वासहार्यते बद्दल नेहमीच शंका घेण्यात आल्यात. अडीच दिवसांच्या सरकारबाबत देखील असच गूढ अद्यापपर्यंत त्यांनी कायम आहे. पण या अशा संशयाच्या धुक्यातुनच पवारांच्या राजकारणाची वाट जाते आणि म्हणूनच अंदाज बांधण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ती अगम्य ठरते , चकवा देणारी ठरते