(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Majha Katta : कोरोनाच्या संकटापेक्षाही अधिक भयानक आजची शिक्षणव्यवस्था, तिला पर्याय हवा; डॉ. अभय बंग यांचं मत
Majha Katta : महात्मा गांधींच्या 'नई तालीम' या शिक्षण व्यवस्थेप्रमाणे आजच्या काळात शिक्षण व्यवस्थेची आवश्यकता असल्याचं मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी मांडलंय.
Majha Katta : कोरोनाच्या संकटापेक्षा अधिक भयानक संकट म्हणजे आजची शिक्षण व्यवस्था आहे. ती इतकी असक्षम आहे की त्यातून मुलांना काहीच मिळत नाही. कोरोनामुळे मुलांची दोन वर्षे वाया गेली अशी ओरड करणारे या वाईट शिक्षण व्यवस्थेवर काहीच बोलत नाहीत. या व्यवस्थेला आता पर्याय गरजेचा आहे. महात्मा गांधींच्या वर्धा शिक्षण योजना किंवा 'नई तालीम'च्या धर्तीवर नव्या शिक्षण व्यवस्थेची गरज असल्याचं मत डॉ. अभय बंग यांनी मांडलंय. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. अभय बंग म्हणाले की, "असरचा सर्व्हे येतोय, त्यामध्ये सांगण्यात येतंय की पाचवीच्या वर्गातल्या मुलाला धड वाचता येत नाही. मग त्या मुलाची पाच वर्षे वाया गेलीच ना? हे शिक्षण व्यवस्थेमध्ये राजरोस घडतंय. ही मुलं खऱ्या अर्थाने निरक्षरच आहेत. हे शिक्षण व्यवस्थेचं दुर्दैव आहे."
डॉ. अभय बंग पुढे म्हणाले की "इंजिनिअरिंग महाविद्यालयातून पास आऊट झालेल्या केवळ 13 टक्के मुलांकडे आवश्यक ते कौशल्य असतं. बाकी 87 टक्के मुलांकडे ते नसतं असा एक अहवाल सांगतोय. मग ही इंजिनिअरिंग महाविद्यालयं कशी चालतात? तीच अवस्था ही वैद्यकीय महाविद्यालयांची आहे. एमबीबीएस झालेल्या डॉक्टरला नीटची परीक्षा पास करण्यासाठी कोचिंग क्लासेस लावायला लागतात. यापेक्षा निरक्षर परडवले. मग आजच्या शिक्षण व्यवस्थेनं काय दिलं. स्वत: अभ्यास न करु शकणारे डॉक्टर दिले, कौशल्य नसलेले इंजिनिअर दिले. ज्यांना लिहिता-वाचता येऊ नये असे प्राथमिक शाळेतील विद्यार्थी दिले."
कोरोना काळात राज्यातील शाळा सरसकट बंद करण्यात आल्या. लहान मुलांना कोरोनाचा धोका तुलनात्मक कमी आहे. पण लहान मुलांमुळे वयस्क लोकांमध्ये संसर्गाचा प्रसार वेगाने होतोय. शाळा बंद करणे याला काही प्रमाणात वैद्यकीय आणि वैज्ञानिक आधार आहे असं मत डॉ. अभय बंग यांनी मांडलंय.
पर्यायी शिक्षण काय असू शकतं याचा आपण कधी विचारच नाही केला. कोरोनाने शाळा या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केलेत. आपण त्याकडे बघत नाही असं मत डॉ. अभय बंग यांनी मांडलं. ते म्हणाले, कोरोनाच्या या दोन वर्षांच्या काळात शाळेतील विद्यार्थ्यांना जीवन अनुभव देता आला असता. 1936 मध्ये महात्मा गांधींनी वर्ध्यामध्ये एक शिक्षण परिषद घेतली आणि नव्या भारताला कशा पद्धतीच्या शिक्षणाची गरज आहे यावर चर्चा केली. त्यांनी 'नई तालीम' ही संकल्पना मांडली. समाजामध्ये जगता-जगता, आवश्यक कर्तव्य करताना शिक्षण घेता येऊ शकेल अशी ती संकल्पना आहे. गांधीजींच्या या 'नई तालीम' या शिक्षण व्यवस्थेत मी शिकलो.
आज जगामध्ये रोग आणि मृत्यू निर्माण करणाऱ्या सर्वोच्च सात कारणांमध्ये दारू आणि तंबाखूचा समावेश आहे. दारूमुळे स्वत:चं नुकसान होतंच पण इतरांचंही नुकसान होतंय. त्यामुळे यावर कायदा करण्याची आवश्यकता असल्याचं मत डॉ. अभय बंग यांनी मांडलं.
महत्त्वाच्या बातम्या :
- Majha Katta : कोरोनाच्या संकटानंतर आपल्याला विकेंद्रीत नगररचना हवीय का याचा विचार करावा लागेल: डॉ. अभय बंग
- Majha Katta : मराठी साहित्यामध्ये टोळी युद्धासारखा प्रकार, समीक्षकांमुळे साहित्याचं नुकसान; 'पानिपत'कार विश्वास पाटील यांची खंत
- Kapil Dev on Majha Katta : कपिल देव यांनी सांगितला लग्नाच्या वेळचा हटके किस्सा