Ambernath News : अंबरनाथच्या प्राध्यापकांची आगरी समाजावर पीएचडी; गावकऱ्यांकडून जंगी स्वागत
Ambernath News : अंबरनाथच्या प्राध्यापकांनी आगरी समाजावर पीएचडी केली आहे. प्राध्यापक मनसे आमदार राजू पाटील यांचे वर्गमित्र. वर्गमित्राच्या कौतुकासाठी राजू पाटील यांचीही उपस्थिती.
Ambernath News : अंबरनाथ तालुक्यातल्या एका प्राध्यापकांनी आगरी समाज (Agari Community) या विषयावर पीएचडी मिळवली आहे. यानंतर त्यांचं कौतुक करण्यासाठी गावकऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. मनसे आमदार राजू पाटील यांचे वर्गमित्र असलेल्या या प्राध्यापकांच्या कौतुकासाठी स्वतः राजू पाटील यांच्यासह अनेक वर्गमित्रही उपस्थित राहिले होते.
सुरेश तुकाराम मढवी असं या प्राध्यापकांचं नाव असून ते अंबरनाथ तालुक्यातल्या उंबार्ली गावात राहतात. गेल्या 23 वर्षांपासून मढवी हे कल्याणच्या के. एम. अगरवाल कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. स्वतः आगरी समाजात जन्मलेल्या सुरेश मढवी यांनी 2014 सालापासून आगरी समाजाचा अभ्यास सुरु केला. यानंतर "ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजाचा आर्थिक आणि सामाजिक अभ्यास" या विषयावर त्यांनी नांदेडच्या स्वामी रामानंद विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली. आगरी समाजात शिक्षणाची सुरुवात 1960 पासून झाली, त्यामुळे त्यापूर्वीचे कोणतेही लेखी संदर्भ उपलब्ध नसताना गावोगाव फिरून माहिती गोळा करत सुरेश मढवी यांनी या विषयाचा अभ्यास केला आहे. आगरी कोळी समाज आद्यनिवासी असूनही विकासापासून वंचित असून आगरी समाजाचा परिचय इतर समाजांना व्हावा, या हेतूनं आपण हा विषय निवडल्याचं सुरेश मढवी यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, सुरेश मढवी यांची पीएचडी पूर्ण झाल्यानंतर अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातल्या ग्रामस्थांना मोठा आनंद झाला आहे. आज सुरेश मढवी यांचं उंबार्ली गावात जंगी स्वागत करण्यात आलं आहे. सुरेश मढवी हे मनसेचे आमदार राजू पाटील यांचे वर्गमित्र आहेत. त्यामुळे राजू पाटील हे सुद्धा यावेळी मित्राचं कौतुक करण्यासाठी उपस्थित होते. राजू पाटील यांच्यासह सर्व वर्गमित्रांनी मिळून सुरेश मढवी यांचं स्वागत केलं आहे. आपल्यासाठी हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याचं ग्रामस्थ आणि वर्गमित्रांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :