(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rohit Pawar on Beed Loksabha : बीडमध्ये बोगस मतदानाचा आरोप; आता रोहित पवारांकडून दोन व्हिडिओ दाखवत कारवाईची मागणी
Rohit Pawar on Beed Loksabha : आमदार रोहित पवार यांनी दोन व्हिडिओ शेअर करत बोगस मतदानाचा आरोप केला आहे. दोन व्हिडिओ ट्विट करताना निवडणूक आयोगाला विचारणा केली आहे.
Rohit Pawar on Beed Loksabha : कधी रोख कॅश सापडणे, तर कधी मनोज जरांगे पाटील आणि पंकजा मुंडे यांचे जोरदार आरोप प्रत्यारोप यामुळे बीड लोकसभेचं (Beed Loksabha) राजकारण ढवळून निघालं आहे. बीड लोकसभेसाठी मतदान पार पडलं असले, तरी आरोपांच्या फैरी अजूनही झडत आहेत. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दोन व्हिडिओ शेअर करत बोगस मतदानाचा आरोप केला आहे. दोन व्हिडिओ ट्विट करताना निवडणूक आयोगाला विचारणा केली आहे. निवडणूक आयोग चौकशी करणार आहे की फक्त विरोधकांवरच आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात धन्यता मानणार? अशी विचारणा त्यांनी केली आहे.
रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, भाजपकडून बीड लोकसभा मतदारसंघात विशेषतः परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान, मतदान केंद्रे ताब्यात घेणे असे गैरप्रकार करण्यात आले. सत्ताधाऱ्यांची हि दडपशाही रोखण्याची हिम्मत बबनभाऊ गीते यासारख्या अनेक सामाजिक कार्यकत्यांनी दाखवली. निवडणूक आयोग या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करणारे आहे की फक्त विरोधकांवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यातच धन्यता मानणार आहे ? असो पण एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाला आदर्श घालून देणाऱ्या बीड जिल्ह्यात दडपशाहीचे हे प्रकार सत्ताधाऱ्यांना शोभत नाहीत.
भाजपकडून #बीड_लोकसभा मतदारसंघात विशेषतः परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान, मतदान केंद्रे ताब्यात घेणे असे गैरप्रकार करण्यात आले. सत्ताधाऱ्यांची हि दडपशाही रोखण्याची हिम्मत बबनभाऊ गीते यासारख्या अनेक सामाजिक कार्यकत्यांनी दाखवली.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 18, 2024
निवडणूक आयोग या प्रकरणांची निष्पक्ष… pic.twitter.com/O3cDBaE3jc
बजरंग सोनवणेंकडून 19 गावांमध्ये फेर मतदान घेण्याची मागणी
तत्पूर्वी, बीडच्या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. बूथ कॅप्चर केल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी परळीमध्ये बूथ ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप करत 19 गावांमध्ये फेर मतदान घेण्याची मागणी केली आहे.
बीडमध्ये सर्वाधिक मतदान
दुसरीकडे, बीड लोकसभेला झालेल्या सर्वाधिक मतदानाने सुद्धा राजकीय चर्चा रंगली आहे. बीड लोकसभेसाठी भाजपकडून पंकजा मुंडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे रिंगणात आहेत. त्यामुळे हा अटीतटीचा सामना कोण जिंकणार? याचे उत्तर चार जून रोजी मिळणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये मराठा आंदोलनाचा सुद्धा मोठ्या प्रभाव पडला आहे. मराठा विरुद्ध ओबीसी असा सुद्धा संघर्ष उभा राहिला आहे. त्यामुळे या लढतीत बाजी कोण मारणार? याचे उत्तर चार जून रोजी मिळणार आहे.
बीड जिल्ह्यामध्ये लोकसभेला आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक 74.19 टक्के मतदान झालं आहे, तर तुलनेत कमी मतदान बीडमध्ये 66.09 टक्के मतदारसंघात झाला आहे. गेवराई मतदार संघामध्ये 71.43 टक्के, केजमध्ये 70.31 टक्के, माजलगावमध्ये 71. 61 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. परळीमध्ये 71.31 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे वाढलेल्या मताचा टक्का कोणाला धक्का देणार? याची चर्चा बीडच्या राजकारणामध्ये रंगली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या