हरियाणात पकडलेल्या चारही दहशतववाद्यांची नांदेडसह, कर्नाटक, गोवा, तेलंगणाच्या विविध भागात रेकी
हरियाणातील कर्नालमध्ये अटक केलेल्या चार दहशतवाद्यांनी नांदेडसह हैदराबाद, बिदर, गोवा भागाची रेकी केल्याची माहिती मिळाली आहे. ही माहिती पुढे आल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे
नांदेड : हरियाणात पकडलेल्या चारही दहशतवाद्यांनी महाराष्ट्रातील नांदेडसह कर्नाटक, गोवा, तेलंगणा राज्याच्या विविध भागात 'रेकी' केल्याची माहिती समोर येत आहेत. हरियाणातील कर्नाल इथे पोलिसांनी स्फोटकासह पकडलेले चार दहशतवादी मार्च महिन्यात चार दिवस नांदेडमध्ये मुक्कामी होते. त्यानंतर बिदरमार्गे गोव्याला गेले होते. या दहशतवाद्यांनी नांदेडसह हैदराबाद, बिदर, गोवा भागाची रेकी केल्याची माहिती मिळाली आहे. ही माहिती पुढे आल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हे दहशतवादी हरविंदर सिहं रिंदा या कुख्यात बब्बर खालसा या संघटनेशी संबंधित आहेत. ते पाकिस्तानमधून आलेला शस्त्रसाठा ते नांदेडला आणणार होते.
हरियाणातील कर्नाल येथे पकडला होता मोठा स्फोटक साठा
कुख्यात हरविंदरसिंग रिंदा याच्या चार साथीदारांना तीन दिवसांपूर्वी हरियाणा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. हरियाणातून मोठ्या प्रमाणात स्फोटके घेऊन नांदेडमध्ये येत होते. त्यावेळी कर्नाल चेक पोस्टवर या चार अतिरेक्यांना पकडलं असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली होती. घातक स्फोटकांच्या आधारे या अतिरेक्यांकडून नांदेड आणि तेलंगणातील आदिलाबाद इथे मोठा घातपात करण्याचा होता, पोलीस तपासात उघड झालं आहे.
नांदेड जिल्ह्यात हाय अलर्ट
दरम्यान या चार जणांचा म्होरक्या कुख्यात गुंड हरविंदर सिंह रिंदा असल्याचे स्पष्ट झाल्याने यात नादेंडचे नाव समोर आलं आहे. त्यानंतर नांदेड जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून पोलिसांनी अॅक्शन मोडमध्ये येत, कॉम्बिंग ऑपरेशन करत रिंदा याच्या शेतात आणि जामिनावर बाहेर आलेल्या त्याच्या साथीदारांच्या घरी धाडसत्र सुरु केलं आहे. त्यावेळी अनेक ठिकाणी शस्त्रसाठाही सापडला आहे.
मार्च महिन्यात होते नांदेडला मुक्कामी
दरम्यान रिंदाचे साथीदार गुरुप्रित, अमनदीप, परमिंदर आणि भपिंदर हे नांदेडकडे वाहनातून येत असताना कर्नाल पोलिसांनी त्यांना पकडले होतं. त्यातच पकडलेले हे आरोपी मार्च महिन्यात नांदेडमध्ये चार दिवस मुक्कामी असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. या दहशतवाद्यांनी नांदेड, बिदर, हैदराबाद आणि गोवा या भागातही रेकी केल्याची माहिती पुढे येत आहे. यास वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे. हे अतेरिकी दरम्यानच्या काळात कुणा-कुणाला भेटले. त्यांचा बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येचा काही संबंध आहे का? याबाबतीतही पोलिसांकडून तपास केल्या जात आहे.
संबंधित बातम्या