..अन् आपलं 'यश' पाहण्यासाठी श्रे'यस'च जगात नाही
अकोला जिल्ह्यातील आसेगाव येथील धांडे कुटुंबियांचं दुर्दैव. वडिलांचं कर्जबाजारीपणा पाहून मुलाने आत्महत्या केली होती, तो बारावीतील उत्तीर्ण झालाय.
अकोला : काल (16 जुलै) बारावीचा निकाल लागला. अकोला जिल्ह्यातील श्रेयस धांडे हा विद्यार्थीही या निकालात 'पास' झाला. मात्र, पुस्तकी निकालात 'पास' झालेला श्रेयस जीवनाच्या खऱ्या परिक्षेत 'नापास' झाला होता. त्यानं आयुष्याची खडतर परिक्षा देण्याआधीच परिक्षेचं मैदान सोडलं होतं. ही दुर्दैवी कहाणी आहे, अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार गावातल्या श्रेयस दिनेश धांडे या विद्यार्थ्याची. श्रेयसनं 18 मे रोजी विषप्राशन केलं होतं. आठवडाभरापर्यंत मृत्यूशी चाललेल्या संघर्षानंतर 25 मे रोजी श्रेयस हे जग सोडून गेला. शेतकरी असलेल्या वडिलांच्या अंगावरील कर्जाचा बोजा आणि त्यांची होणारी तगमग पाहून अस्वस्थ झालेल्या श्रेयसनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं होतं.
काल बारावीचा निकाल लागला. यात श्रेयसही 42.70 टक्के गुण घेत उत्तीर्ण झाला आहे. श्रेयस हा अकोटच्या श्री शिवाजी महाविद्यालयातील बारावी वाणिज्य शाखेचा विद्यार्थी होता. काल बारावीचा निकाल लागल्यापासून श्रेयसचे आई-वडील आणि दोन भावंडांचे अश्रू थांबता थांबत नाही आहे. काल जसा निकाल आला तसा या कुटुबियांच्या आसमंत भेदून टाकणाऱ्या आक्रोशानं साऱ्या गावाचे डोळे पाणावलेत. 'माह्या श्रेयस पास झाला राजे हो भाऊ' म्हणत वडील बिलगून रडत होते. आई माया तर कालपासून अक्षरश: शुन्यात हरवून गेली आहे. तर मोठी बहीण अन लहान भाऊ आपल्या भावाच्या आठवणीनं व्याकूळ होऊन गेले आहेत.आई-वडिलांची अत्यंत हलाखीची परिस्थिती दिनेश धांडे हा आसेगावातील अल्पभूधारक शेतकरी. पती-पत्नी आणि तीन मुलं असं पाच जणांचं कुटुंब. फक्त घरी असलेल्या पावणेदोन एकर शेतावरच घरचा चरितार्थ चालतो. यातच तीन मुलांचं शिक्षण. परिस्थिती आणि नापिकीच्या फेऱ्यात दिनेश हे कर्जबाजारी झाले होते. या परिस्थितीत श्रेयसही वडिलांना शेतीसह सर्व कामांत मदत करीत होता. तो आपल्या बापाचा संघर्ष, तगमग अतिशय जवळून पहात होता. एरव्ही अभ्यासात चांगली गती असणाऱ्या श्रेयस आपल्या वडिलांचा संघर्ष पहात अधिकच अस्वस्थ होत होता. त्याची अस्वस्थता त्यानं अनेकदा आई-वडिलांकडे बोलूनही दाखवली. मात्र, या परिस्थितीवर मुलांनी चांगलं शिकून पुढे जाणं हेच यावरचं उत्तर असल्याचं सांगत आई-वडील त्याला धीर द्यायचेच.
मात्र, संवेदनशील मनाच्या श्रेयसवर वडिलांच्या कर्जबाजारीपणाचा, त्यांच्या संघर्षाचा खोलवर परिणाम झाला होता. यातूनच त्याने 18 मे रोजी शेतात विषप्राशन केलं. त्याच्यावर अकोल्यात उपचार सुरू होते. मात्र, 25 मे रोजी श्रेयसच्या जगण्याचा संघर्ष संपला. याचदिवशी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. श्रेयसचं संपूर्ण कुटूंब तेव्हापासून या धक्क्यातून सावरलेलं नाही.
HSC Results | बारावीच्या निकालात जुळ्या बहिणीचं घवघवीत यश; मार्कांची परंपरा कायम
प्रत्येक उपक्रमांमध्ये श्रेयसचा होता पुढाकार : श्रेयस हा त्याच्या वर्गात हरहुन्नरी विद्यार्थी म्हणून ओळखला जायचा. शाळेतील आणि गावातील प्रत्येक उपक्रमात त्याचा सक्रीय सहभाग असायचा. शाळेतील कार्यक्रम सामान्यज्ञान स्पर्धा, मैदानी खेळातही त्यानं अनेक बक्षिसं जिंकलीत. दहाव्या वर्गातही त्यानं 62 टक्के गुण मिळवले होते. भविष्यात त्याला अधिकारी व्हायचं होतं. मात्र, सर्व स्वप्नं ऐन मधातच उध्वस्त झाल्याचं दु:ख त्याच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि गावकऱ्यांना आहे.
आयुष्यातील संघर्ष हा कधीतरी नक्कीच थांबणारा असतो. अशा परिस्थितीत संयम आणि विवेक कायम ठेवून संघर्ष सुरू ठेवायचा असतो. दुर्दैवानं संघर्षापुढे शस्त्र खाली टाकणारा परंतु, तेव्हढ्याच संवेदनशील मनाच्या श्रेयसला त्याच्या कुटुंबियांनी गमावलं आहे.
Maharashtra HSC Results | राज्याचा बारावीचा निकाल 90.66 टक्के, मागील वर्षीच्या तुलनेत प्रगती