Kolhapur News : पुण्यात दिवसाढवळ्या मुडदे पाडणारा कोयता कोल्हापुरातही पोहोचला, किरकोळ वादातून कोयते नाचवत दहशत, दुकान फोडले
Kolhapur News : मिळालेल्या माहितीनुसार चौधरी यांच्या दुकानांमध्ये खाऊ घेण्यासाठी लहान मुलगा आला होता. यावेळी मुलाला दुकानातून हटवण्याच्या वादातून ठिणगी पडली.
कोल्हापूर : पुण्यात दिवसाढवळा कोयत्याने मुडदे पाडले जात असतानाच कोल्हापूरमध्ये सुद्धा आता दिवसाढवळा कोयत्याने दहशत माजवण्याचा प्रकार सुरु झाला आहे. कोल्हापुरातील वारे वसाहतीमध्ये लहान मुलाला दुकानातून हटवल्याच्या वादातून थेट दुकानामध्ये घुसून दहशत माजवण्याचा प्रकार घडला. यावेळी दुकानातील खाऊच्या बरण्यांवर कोयत्याने प्रहार करून फोडून टाकण्यात आल्या. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी घडला. याबाबत दुकानदार खेमाराम पुनाराम चौधरी (रा. वारे वसाहत, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.
एकाने कोयता घेत प्रहार केला, तर दुसऱ्याने दुकानातील बरण्या फोडल्या
मिळालेल्या माहितीनुसार चौधरी यांच्या दुकानांमध्ये खाऊ घेण्यासाठी लहान मुलगा आला होता. यावेळी मुलाला दुकानातून हटवण्याच्या वादातून ठिणगी पडली. यावेळी चार ते पाच जणांनी वाद घातल्यानंतर ते निघून गेले. त्यानंतर दहा मिनिटांनी हाती शस्त्रे घेत दोन ते तीन तरुण दुकानांमध्ये आले आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी एकाने कोयता घेत प्रहार केला, तर दुसऱ्या एकाने एका पाठीमागे एक दुकानातील बरण्या उचलत फोडून टाकल्या. यावेळी दुकानातून मागून आलेल्या तरुणीने त्यांना हाती झाडू घेत थांबवण्याचा प्रयत्न केला.
यानंतर दुकानात जाऊन दुकानदारांना सुद्धा मारहाण करण्यात आली. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिस सुद्धा त्या ठिकाणी पोहोचले. सराईत गुन्हेगार ऋत्विक साठेसह यश माने आणि मंथन या तिघांनी कोयत्याने दहशत माजवल्याचे स्पष्ट झाले. तिघांचा शोध सुरू करण्यात आला आहे. वारंवार धमकी देण्याचे सत्र सुरु असल्याने अशांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
जेवणात विष कालवणाऱ्या मामाला अटक
दरम्यान, मर्जीविरोधात भाचीने केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात धरून मामाने स्वागत समारंभातील जेवणात विष कालवल्याप्रकरणी पन्हाळा पोलिसांत अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत मामा महेश जोतीराम पाटील (वय ४५, रा. उत्रे, ता.पन्हाळा) याला पन्हाळा पोलिसांनी अटक केली आहे.विष कालवलेल्या अन्नपदार्थाचे नमुने घेतले असून औषधाची बाटली आणि संशयितांची दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मामाकडे राहणाऱ्या भाचीने गावातील तरूणाशी प्रेमविवाह केला होता. मंगळवारी गावातील एका मंगल कार्यालयात भाचीच्या लग्नाचा स्वागत समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी पाहुण्यांसाठी जेवण बनविलेल्या भांड्यात त्यांनी विष टाकून कार्यक्रमातील लोकांच्या जीवितास धोका पोहोचविण्याच्या उद्देशाने महेशने कृत्य केल्याची माहिती पन्हाळा पोलिसांनी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या