Vijay Wadettiwar : शरद पवार सोबत आले तरच तुम्ही मुख्यमंत्री, पंतप्रधान मोदींची अजित पवारांना अट; वडेट्टीवारांचा दावा
अजित पवार हे शरद पवारांचे समर्थन मिळवण्यासाठी वारंवार त्यांना भेटत असल्याचे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलं.
Vijay Wadettiwar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)हे सोबत आले तरच अजित पवारांना (Ajit Pawar) मुख्यमंत्री होता येईल ही अट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी अजित पवार समोर ठेवली आहे. त्यामुळं अजित पवार हे शरद पवारांचे समर्थन मिळवण्यासाठी वारंवार त्यांना भेटत असल्याचे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलं. ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते, यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवरून थोडा संभ्रम
अजित पवार हे शरद पवारांना भेटण्यासोबतच त्यांच्या सोबत येण्यासाठी दया, याचना करत असावेत असेही वडेट्टीवार म्हणाले. दरम्यान, आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवरून थोडा संभ्रम आहे. मात्र आज शरद पवार यांच्या बीड मधील भाषणाने तो संभ्रम दूर होईल असे वडेट्टीवार म्हणाले.
शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीमुळं महाविकास आघाडीत संभ्रम
सध्या राज्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार हे राज्याचे दौरे करत असल्याचे चित्र आहे. मात्र, दुसरीकडे अजित पवार हे शरद पवारांनी आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरु आहे. मागील तीन चार दिवसापूर्वीच पुण्यातील उद्योगपती चोरडिया यांच्या बंगल्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट झाली. पण त्यावरुन सुरु असलेल्या राजकारणाचं गुऱ्हाळ अद्याप काही संपेना. या भेटीमुळं महाविकास आघाडीमध्ये चिंतेचं वातावरण आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. अशातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक दावा केलाय. शरद पवारांना सोबत घेतलं तरच अजित पवारांना मुख्यमंत्री होता येईल अशी अट मोदींनी अजित पवारांना घातल्याचे वडेट्टीवार म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या: