कोल्हापूरकरांचं पशूप्रेम! श्वानाचं निधन झाल्यानंतर वर्षश्राद्ध घालत संपूर्ण गावाला जेवण
वाघ्याला जाऊन आज वर्ष झालं. त्याची आठवण राहावी यासाठी मंडळाच्या वतीने गाव जेवण घालून प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम ठेवला.
कोल्हापूर : जगात भारी आम्ही कोल्हापुरी असं म्हणतात ते काही उगाच नाही. कोल्हापूरकरांनी नेहमीच आपल्या विविधपूर्ण संस्कृतीने जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केलीय. त्यामुळे कोल्हापूर नेहमीच चर्चेत राहिले आहे. आता हेच पाहा ना! आपल्या गल्लीत असणाऱ्या वाघ्या नावाचा श्वानाचे निधन झाल्यानंतर वर्षभराने त्याचे प्रथम पुण्यस्मरण करण्यात आले.
गाव जेवण घालून एखाद्या श्वानाचे वर्ष श्राद्ध घातल्याचे तुम्ही कधी ऐकलं नसेल किंवा पाहिलं देखील नसेल. पण कोल्हापूर शहराच्या उत्तरेश्वरपेठ याठिकाणी ते घडलं आहे. एखाद्या प्राण्याला आपण जीव लावला की तो देखील आपल्यावर जीव लावत असतो. दोन वर्षांपूर्वी वाघ्या नावाचा जखमी झालेला श्वान मस्कृती तलाव मित्र मंडळाच्या जवळ आला. त्याला मग मंडळातील तरुणांनी उपचार केले. गल्ली वाघ्या म्हणून त्याला ओळखत असतं. मंडळाचे कितीही किमती साहित्य असले तरी वाघ्याच्या जीवावर सगळं असायचं. पण गेल्या वर्षी वाघ्याचे अचानक निधन झाले. अख्खी गल्ली वाघ्याबद्दल हळहळली.
वाघ्याला जाऊन आज वर्ष झालं. त्याची आठवण राहावी यासाठी मंडळाच्या वतीने गाव जेवण घालून प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम ठेवला. यावेळी वाघ्या परत ये अशी हाक उत्तरेश्वरपेठ येथे असणाऱ्या मस्कृती तलाव मित्र मंडळाने दिली आहे. गल्लीत वाघ्या अशी हाक दिली तर, धावत येणारा हा वाघ्या आज हाकेला धावत येत नाही. त्याची खंत आज देखील या गल्लीत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आहे.
वाघ्याचा सहवास आजदेखील येथील लोकांना जाणवतो. त्याच्या प्रेमापोटी आज या गल्लीतील नागरिकांनी वाघ्याचे प्रथम पुण्यस्मरण गाव जेवण घातले. दोन वर्षांपूर्वी गावठी कुत्र्यांनी जखमी केलेल्या अवस्थेत वाघ्या गल्लीतील मुलांच्या नजरेस पडला होता. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर उपचार करत त्याचा सांभाळ सुरू केले. बघता बघता वाघ्या मोठा झाला आणि मंडळात रमून गेला. मात्र आज वाघ्या नसल्याचे दुःख वाटते असे गल्लीतील कार्यकर्ते म्हणतात.