(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आदित्य ठाकरेंचा वरळी पाहणी दौरा, वरळी पॅटर्न सर्वत्र राबवण्याचा मानस
कोरोनाबाधित रुग्णांचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या रोखण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
मुंबई : कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज आपल्या मतदारसंघाचा म्हणजे वरळी विभागाचा पाहणी दौरा केला. यावेळी मुंबई महापालिकेचे अधिकारीही त्यांच्यासोबत होते. पाहणी दौऱ्यानंतर एबीपी माझाशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी वरळी पॅटर्न सर्वत्र राबवण्याचा मानस व्यक्त केला. कोरोनाबाधित रुग्णांचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या रोखण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
गर्दी टाळण्यासाठी आमचे छुपे पाहणी दौरे सुरुच आहेत. मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे, मात्र रिकव्हरी रेटची वाढतो आहे. जी साऊथमधील 500 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रोखण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र आता काही बोलण्यापेक्षा करून दाखवण्याची वेळ आहे, असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
Aaditya Thackeray | मंत्री आदित्य ठाकरेंकडून वरळी विभागाचा पाहणी दौरा, वरळी पॅटर्न सर्वत्र राबवण्याचा मानस - आदित्य ठाकरे
केंद्रीय पथकाकडून वरळी पॅटर्नचं कौतुक
वरळीत कोळीवाडा हा लोकसंख्येची घनता जास्त असलेला प्रदेश आहे. तरीही प्रशासनाने इथली परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे हाताळली आहे. याबद्दल केंद्राच्या पथकानेही प्रशासनाचं कौतुक केलं होतं. जी साऊथ विभागाच्या कामगिरीवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शाबासकीची थाप दिली होती. जी साऊथ वॉर्ड अधिकारी शरद उघाडे यांच्या नेतृत्वाखाली ही सर्व टीम काम करत आहे. केंद्राचं दुसरं पथकही वरळी भेट देऊन गेले, त्यांनीही प्रशासनाच्या कामाचं कौतुक केलं होतं. हे पथक वरळी पटर्नचा अहवाल केंद्राकडे पाठवणार आहेत. तर, महापालिका राज्य सरकारकडे याचा आराखडा पाठवणार आहे.
बीएमसी आयुक्त प्रविण परदेशींची बदली
मुंबईतील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची दोन दिवसांआधी बदली करण्यात आली. नगरविकासमध्ये अतिरिक्त मुख्य सचिवपदी परदेशी यांची बदली करण्यात आली आहे. तर, इक्बाल चहल यांना मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. आयुक्तपदाची सूत्र सांभाळल्यानंतर इक्बाल चहल अॅक्टिव्ह झाले असून त्यांनी मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाहणी दौरे सुरु केले आहेत.