एक्स्प्लोर
Advertisement
गैरहजर राहिल्यामुळे सोलापूरच्या 'अश्विनी'तील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्ससह कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे
गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश पालिकेतर्फे देण्यात आले. मात्र तरी देखील वैद्यकीय सेवा बजवणारे डॉक्टर, कर्मचारी, अधिकारी कामावर रुजू झाले नाहीत.
सोलापूर : सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटलमधील 133 वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि इतर सेवकांवर काल, शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती कोविड हॉस्पिटलसाठी नियुक्त सनियंत्रण अधिकारी धनराज पांडे यांनी दिली. कोरोना संसर्गामध्ये रुग्णालयात उपस्थित राहून रुग्णसेवा न देता गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातील सदर बझार पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सोलापुरात कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गात खासगी दवाखाने बंद राहिल्याने रुग्णांना सेवा मिळाली नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या.तसेच शासकीय रुग्णालयावर ही याचा ताण आला होता. त्यामुळे पालिकेच्यावतीने रुग्णालयांना नोटीस बजवण्यात आल्या होत्या. यावेळी रुग्णालयातर्फे स्टाफ कमी असल्याची तक्रार केली जात होती.
त्यामुळे गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश पालिकेतर्फे देण्यात आले. मात्र तरी देखील वैद्यकीय सेवा बजवणारे डॉक्टर, कर्मचारी, अधिकारी कामावर रुजू झाले नाहीत. त्यानंतर पालिकेतर्फे हॉस्पिटलमध्ये गैरहजर असणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी हॉस्पिटलला मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले संबंधित लोकांना रुग्णालयांनी नोटिसा पाठवल्या तरी वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आणि डॉक्टर कामावर रुजू होत नसल्याचे पाहून पालिकेतर्फे अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान यशोधरा हॉस्पिटल, सिद्धेश्वर स्पेशालिटी हॉस्पिटल, चिडगुपकर हॉस्पिटल आणि धनराज गिरजी हॉस्पिटल खास कोविड रुग्णांवर उपचारासाठी घोषित करण्यात आली आहेत. मात्र या हॉस्पिटलमध्ये काही डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी, सेवक गैरहजर असल्याचे निदर्शनास आले आहे. या रुग्णालयांमधील जवळपास 238 वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर यांना अल्टिमेटम देण्यात आला आहे. जर आज, रविवारी दुपारी बारा वाजेपर्यंत संबंधित अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी सेवेवर हजर राहिले नाही तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येईल. अशी माहिती धनराज पांडे यांनी दिली. कोविड रुग्णांवर उपचारासाठी जाहीर करण्यात आलेल्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना दाखल करून घेतले पाहिजे. कोणत्याही हॉस्पिटलमध्ये रुग्णांना दाखल करून घेण्यात हयगय करु नये, काही समस्या असल्यास त्या प्रशासनाकडून सोडविण्यात येतील, असेही पांडे यांनी सांगितले.
दरम्यान सोलापूर शहरात काल (शनिवारी) 41 रुग्णांचे अहवाल पॉसिटिव्ह आढळले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत सोलापूर शहरात 1543 जण कोरोनाबाधित आहेत त्यापैकी 133 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दिवसभरात 21 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. आतापर्यंत 802 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर उर्वरित 608 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अमरावती
ठाणे
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement