कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी : आशिष शेलार
आशिष शेलार यांच्या या विधानाचा रोख सुप्रिया सुळे यांच्याच दिशेने होता,अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. हे वक्तव्य करून आशिष शेलार यांनी एका दगडात तीन पक्षी मारल्याची पण चर्चा आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कर्तृत्ववान मराठा स्त्री व्हावी अशी अपेक्षा बाळगणारा समाजात मोठा वर्ग आहे. याला माझ्यासारख्या माणसाचे सुद्धा शंभर टक्के समर्थन असू शकते, असं वक्तव्य भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्यासमोर केल्यानं भुवया उंचावल्या आहेत.
आशिष शेलार यांच्या या विधानाचा रोख सुप्रिया सुळे यांच्याच दिशेने होता,अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. हे वक्तव्य करून आशिष शेलार यांनी एका दगडात तीन पक्षी मारल्याची पण चर्चा आहे. सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या विषयाने अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अस्वस्थता वाढवण्याची खेळी या निमित्ताने आशिष शेलार यांनी केली . इतकच नाही तर आपल्या पक्षातील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षेलाही छेद दिलाय अशी चर्चा सुरू झाली.
नुकताच मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी भाजपने अतुल भातखळकर यांना देण्यात आली. मुंबई महापालिकेत भाजपला सगळ्यात मोठं यश आशिष शेलार यांच्या नेतृत्वात मिळालं होतं. त्यांच्या अनुपस्थितीत ही जबाबदारी अतुल भातखळकर यांच्या नावाची घोषणा झाली आणि त्यानंतर झालेल्या या कार्यक्रमात आशिष शेलार यांनी थेट मराठा महिला मुख्यमंत्र्यांचा विषय छेडून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू केल्या.
पत्रकार विजय चोरमारे यांच्या "कर्तृत्ववान मराठा स्त्रिया" या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात शरद पवार यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी भाजपचे नेते आशिष शेलार आणि पत्रकार ज्ञानेश महाराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुस्तक प्रकाशनानंतर बोलताना पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी आशिष शेलार यांचा उल्लेख महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा केला. महारावांच्या या वक्तव्यावर आशिष शेलार यांनी तोंडासमोर तेच पुस्तक धरून तोंड लपवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुस्तकावर केलेल्या भाषणात शेलार यांनी महारावांच्या या वक्तव्याला उत्तर देताना हे खळबळजनक वक्तव्य केलं.
शरद पवार हे मोठ्या मनाचे मोठे नेते आहेत. मोठ्या पदावर तर बरीच लोकं बसतात, पण मोठ्या मनाने मोठ्या पदावर बसणारी व्यक्ती या महाराष्ट्रात खूप कमी आहेत, मला कुणाशी तुलना करायची नाही, असंही वक्तव्य आशिष शेलार यांनी यावेळी केलं. आशिष शेलारांच्या या वक्तव्याचा रोख कुणाकडे आहे अशी चर्चा यामुळे सुरू झाली आहे.