8 April In History: स्वातंत्र्य चळवळीची ठिणगी पेटवणारे मंगल पांडे यांना फाशीची शिक्षा, भगत सिंह-बटुकेश्वर दत्त यांनी असेंब्ली हॉलमध्ये बॉम्ब फेकला; आज इतिहासात
8 April In History: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा पहिला उठाव 1857 मध्ये झाला. या उठावाची सुरुवात करणारे मंगल पांडे यांना ब्रिटिशांनी आजच्या दिवशी फाशी दिली होती.
8 April In History: भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाने आज महत्त्वाचा दिवस आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा पहिला उठाव 1857 मध्ये झाला. या उठावाची सुरुवात करणारे मंगल पांडे यांना ब्रिटिशांनी आजच्या दिवशी फाशी दिली होती. तर, लोकांचा विरोध, सरकारविरोधी भावना दडपण्यासाठी ब्रिटिश सरकारने पब्लिक सेफ्टी बिल आणले होते. या विधेयकाला विरोध करण्यासाठी भगत सिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी सेंट्रल असेंब्ली हॉलमध्ये बॉम्ब फेकला.
1857: मंगल पांडे यांना फाशीची शिक्षा Mangal Pandey
मंगल पांडे हे भारताच्या 1857 च्या स्वातंत्र्य युद्धातील आद्य क्रांतिकारक मानले जातात. पांडे हे बराकपूर सैन्यदलामधील बंगालच्या 34 व्या बी. एन. आय तुकडीच्या ५ व्या कंपनीत काम करत होते. कोलकात्याजवळील बराकपूर येथील १९ व्या पलटणीला दिलेली काडतुसे गाय वा डुक्कर यांची चरबी लावलेली आहेत असा समज सैन्यात पसरला होता. ही काडतुसे बंदुकीत भरण्यापूर्वी त्यांना लावलेले आवरण दातांनी तोडावे लागे. अशा वेळी या आवरणाला लावलेली गाईची वा डुकराची चरबी तोंडात जाऊ शकेल या भीतीने या पलटणीतील शिपायांनी ती काडतुसे स्वीकारण्याचे नाकारले. इतकेच नव्हे, तर प्रतिकारार्थ त्यांनी शस्त्र उपसले. त्या दिवशी ब्रिटिश अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने ब्रिटिशांनी तो अपमान मुकाट्याने गिळला. त्यांनी म्यानमारहून गोऱ्या सैनिकांची कुमक मागवून या पलटणीला निःशस्त्र करण्याचे ठरवले. याची अंमलबजावणी बराकपूरला करण्याचे ठरले. या अपमानास्पद कारवाईमुळे मंगल पांडेने आपल्या सहकाऱ्यांना ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन केले.
मंगल पांडे यांनी 29 मार्च 1857 रोजी बराकपूर छावणीतील कवायतीच्या मैदानावर ब्रिटिश करत असलेल्या अन्यायाविरुद्ध प्रतिकार केला. यावेळी त्यांची आणि ब्रिटिश अधिकारी, सैन्यांमध्ये झटापट झाली. अखेर मंगल पांडे यांनी अटक करण्यात आली आहे. सैनिकी न्यायलयात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 8 एप्रिल रोजी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. ही घटना 1857 च्या स्वातंत्र्य युद्धाची ठिणगी समजली जाते.
1894: कवी बंकिमचंद्र चटर्जी यांचे निधन
बंगाली कवी, कादंबरीकार, पत्रकार बंकिमचंद्र चॅटर्जी यांचे निधन झाले. 1876 मध्ये त्यांनी लिहिलेल्या आनंदमठ या कांदबरीमध्ये वंदे मातरम हे गीत होते. या गीताने पुढे स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणा दिली. आनंदमठ ही कादंबरी 1882 मध्ये प्रकाशित झाली होती. बंगाली मधून लिहलेल्या कादंबऱ्या, कविता खूप लोकप्रिय झाल्या. त्यांच्या साहित्याचे सर्व देशी भाषामधून अनुवाद झाले. 'राजमोहन्स वाईफ' (1864) ही बंकिमचंद्रांनी लिहिलेली पहिली कादंबरी होती.
1924 : महान शास्त्रीय गायक कुमार गंधर्व यांचा जन्म Kumar Gandharva
तत्कालीन हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील घराण्यांच्या पारंपरिक भिंती भेदून त्यांनी स्वतःची आगळ्या ढंगाची गायकी घडवणारे शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व यांचा आज जन्मदिवस. कुमार गंधर्वांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर, भेंडीबाजार वगैरे सर्व घराण्यांचे सार काढून नवीनच गायकी निर्माण केली. माळवी लोकगीतांचा विशेष अभ्यास करून त्यांवर आधारित असे ‘गीत वर्षा’, ‘गीत हेमंत’, ‘गीत वसंत’ इ. कार्यक्रम सादर केले व संगीताला एक नवीनच क्षेत्र उपलब्ध करून दिले.
1928 : साहित्यिक रणजित देसाई यांचा जन्म Ranjit Desai
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील श्रीमान योगी आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील स्वामी या प्रसिद्ध कांदबऱ्यांचे लेखक साहित्यिक रणजित देसाई यांचा जन्म. त्यांना स्वामीकार या नावाने ही ओळखले जाते. 'स्वामी' कादंबरीसाठी त्यांना 1964 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला. साहित्य विश्वातील योगदानासाठी त्यांना 1973 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
1929 : भगतसिंह व बटुकेश्वर दत्त यांनी सेंट्रल असेंब्लीत बॉम्ब फेकला Bhagat Singh Battukeshawar Dutt
लोकांचा विरोध, सरकारविरोधी भावना दडपण्यासाठी ब्रिटिश सरकारने पब्लिक सेफ्टी बिल आणले होते. या विधेयकाला विरोध करण्यासाठी भगत सिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी सेंट्रल असेंब्ली हॉलमध्ये बॉम्ब फेकला. बॉम्ब फेकल्यानंतर त्यांनी सभागृहात इन्किलाब जिंदाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद आदी घोषणा देत बॉम्ब फेकण्याची कृती का केली याची पत्रके फेकली. भगत सिंह आणि बटुकेश्वर दत्त यांना ब्रिटिशांनी अटक केली. या घटनेमुळे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीची भूमिका लोकांमध्ये पोहचली.
1982 : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा वाढदिवस Allu Arjun
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा आज वाढदिवस आहे. अल्लू अर्जुनने बालकलाकार म्हणूनदेखील काम केले. गंगोत्री चित्रपटाद्वारे खऱ्या अर्थाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. आर्या या चित्रपटातील भूमिकेने त्याचा चाहता वर्ग निर्माण झाला. त्यानंतर बनी या चित्रपटातील भूमिकेचे कौतुक झाले. वेदम' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा द राइज' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. या सिनेमातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्नाची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 300 कोटींपेक्षा अधिक कमाई केली. या चित्रपटाचा आता सिक्वेल प्रदर्शित होणार आहे.