(Source: ECI/ABP News/ABP Majha)
22nd May In History: राजा राममोहन रॉय यांचा जन्म, कॉम्रेड डांगे यांचे निधन; आज इतिहासात...
22nd May In History: भारतात नवविचाराचे जनक समजले जाणारे राजा राममोहन रॉय यांचा आज जन्मदिवस आहे. तर, भारतीय स्वातंत्र्यलढा, कामगार चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते असलेले कॉम्रेड डांगे यांचे निधनही आजच्या दिवशी झाले होते.
22nd May In History: प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. प्रत्येक दिवशी इतिहासात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. भारतात नवविचाराचे जनक समजले जाणारे राजा राममोहन रॉय यांचा आज जन्मदिवस आहे. तर, भारतीय स्वातंत्र्यलढा, कामगार चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते असलेले कॉम्रेड डांगे यांचे निधनही आजच्या दिवशी झाले होते. जाणून घेऊयात आजच्या दिवसातील घडामोडी...
जागतिक जैवविविधता दिन World Biodiversity Day
सजिवांना पृथ्वीवर जगायचं असेल तर जैवविविधता टिकून राहणं खूप महत्वाचं आहे. सध्या भूतलावरील जैवविविधतेमध्ये मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होताना दिसत आहे. त्याला अनेक मनुष्यनिर्मित गोष्टी कारणीभूत आहेत. त्यामुळे या विषयावर लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या वतीने दरवर्षी 22 मे रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा करण्याचं जाहीर करण्यात आलं आहे. जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी लोकांनी एक भूमिका घेतली पाहिजे, कृती केली पाहिजे आणि जैवविविधतेसोबत एक प्रकारचा संबंध निर्माण केला पाहिजे हा या मागचा उद्देश आहे.
1772 : समाजसुधारक, धर्मसुधारक आणि ब्राम्हो समाजाचे संस्थापक राजा राममोहन रॉय यांचा जन्म Raja Ram Mohan Roy
भारतात नवविचाराचे जनक समजले जाणारे राजा राममोहन रॉय यांचा आज जन्मदिवस. राजा राममोहन रॉय हे एक भारतीय समाजसुधारक होते. त्या काळात प्रशासनासाठी वापरली जाणारी भाषा पर्शियन व अरेबिक होती. त्यामुळे या भाषा शिकण्यासाठी वडिलांनी त्यांना पाटणा येथे पाठविले. अरबी आणि फारसी भाषांबरोबरच त्यांनी इस्लाम धर्म आणि सुफी पंथ, शायर आणि शायरी यांचादेखील अभ्यास केला
राजा राममोहन रॉय ह्यांनी मूर्तिपूजेला, देवदेवतांच्या पूजेला विरोध केला. जीवसृष्टीचा निर्माता एकच आहे आणि तो निर्गुण, निराकार आहे, असे ते मानत. हिंदू धर्मातील कालबाह्य झालेल्या रूढी व परंपराना त्याचा विरोध होता. भारतातील समाजाला नवी दिशा देणे ही त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी 1828 साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली. त्याशिवाय, ख्रिश्चन धर्माचाही त्यांनी अभ्यास केला. जुन्या प्रथा, परंपराविरुद्ध लढा दिला.
भारतातील धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था, व शिक्षणव्यवस्था यासंदर्भात लेखन करण्यास सुरुवात केली.त्यासाठी काही वृतपत्रे तसेच सुधारणा चळवळ सुरू केली. त्यांनी 4 डिसेंबर 1821 रोजी संवाद कौमुदी हे बंगाली भाषेतील तर 12 एप्रिल 1822 रोजी मिरात उल अखबार हे पर्शियन वृतपत्र सुरू केले. त्यांनी 1828 साली प्रेसिडेन्सी कॉलेज सुरू केले. राजा राममोहन रॉय यांनी लॉर्ड विलियम बेंटिक या भारताच्या गव्हर्नर जनरलच्या साहाय्याने 1829 मध्ये भारतातील सतीची प्रथा कायद्याने बंद केली.
1783 : विद्युत चुंबकाचे शोधक विल्यम स्टर्जन यांचा जन्म
स्वत:च्या वजनापेक्षा अधिक वजन तोलून धरू शकणार्या विद्युत् चुंबकाचा शोध लावणारे विल्यम स्टर्जन यांचा आज जन्मदिन. 1825 मध्ये विल्यम स्टर्जन यांनी व्यवहारात प्रत्यक्ष उपयोगी पडणारे विद्युत् चुंबक बनविण्यास सुरूवात केली. त्यासाठी मृदू लोखंडी गाभ्याभोवती बसविलेल्या संवाहक तारेच्या वेटोळ्यांतून विद्युत् प्रवाह जात असताना त्या गाभ्याला चुंबकत्व प्राप्त होते आणि प्रवाह थांबताच गाभ्यातील चुंबकत्वही नष्ट होते, या तत्त्वाचा उपयोग केला. विद्युत् चुंबकाचा उपयोग बिडाचे तुकडे, लोखंडी कतरण अशांसारखा चुंबकीय राशिमाल थेट आकर्षणाने धरून आणि यारीच्या साहाय्याने उचलण्यासाठी करता येते. या प्रकारच्या चुंबकांना उच्चालक (उत्थापक) विद्युत् चुंबक म्हणतात.
1871 : संस्कृत विद्वान, भाषांतरकार विष्णू वामन बापट यांचा जन्म
महाराष्ट्रातील एक शांकरमतानुयायीअद्वैती. संस्कृतातील बरेचसे प्राचीन तत्त्वज्ञानसाहित्य विष्णू बापट यांनी मराठीत आणले. गीता, उपनिषदे आणि ब्रह्मसूत्र ह्या प्रस्थानत्रयीचा शांकरभाष्यानुसार परिचय त्यांनी मराठीतून घडविला. तसेच भारतीय तत्त्वज्ञानातील अद्वैतादी विविध दर्शनांवर मराठीतून लेखन केले.
1991: कॉम्रेड श्रीपाद डांगे यांचे निधन Shripad Amrit Dange Death Anniversary
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य आणि भारतातील ट्रेड युनियन चळवळीचे अध्वर्यू कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचे आजच्या दिवशी निधन झाले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कॉम्रेड डांगे सक्रिय होते. कम्युनिस्ट चळवळीच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळ आणि ट्रेड युनियनच्या कामामुळे त्यांनी ब्रिटिश काळात जवळपास 13 वर्ष तुरुंगवास भोगला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. कॉम्रेड डांगे यांची भाषणे लोकांची पकड घेत असे. सुरुवातीला शांत, संयमीपणाने सुरुवात केलेले भाषण उत्तरार्ध अधिक आक्रमक होत असे.
कॉम्रेड डांगे यांच्यावर लोकमान्य टिळक यांचा मोठा प्रभाव होता. 1917 मध्ये रशियात क्रांती झाल्यानंतर त्यांनी मार्क्सवादाचा अभ्यास सुरू केला. भारतात 1925 मध्ये कम्युनिस्ट पक्ष स्थापन करणाऱ्या सदस्यांपैकी ते एक होते. मुंबईतील कापड कामगारांमधील कामगार कार्यकर्त्यांना कम्युनिस्ट छत्राखाली आणण्यात डांगे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 1928 च्या सामान्य संपादरम्यान कम्युनिस्टांनी गिरणी कामगार युनियनची स्थापना केली. डांगे यांनी गिरणी कामगार युनियनच्या स्थापनेपासूनच क्रांती या मराठी नियतकालिकाचे संपादन केले. कॉम्रेड डांगे हे कानपूर बोल्शेविक कट, मीरत कटातील प्रमुख आरोपींपैकी एक होते. या दोन्ही खटल्यात अनेक कम्युनिस्ट नेत्यांना तुरुंगवास झाला होता.
कॉम्रेड डांगे यांनी भारतातील कम्युनिस्ट चळवळीसह वैचारीक क्षेत्रातही योगदान दिले आहे. त्यांनी लिहिलेली पुस्तके, लेख अभ्यासपूर्ण असे. त्यावर मोठ्या चर्चा झडल्या आहेत. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून 1957 आणि1967 च्या निवडणुकांमध्ये निवडून गेले आहेत.
भारतीय कम्युनिस्ट पक्षात 1964 मध्ये पार्टी लाइनवरून मोठी फूट पडली. कॉम्रेड डांगे यांच्या भूमिकेविरोधात केंद्रीय समितीमधील 32 सदस्यांनी आवाज बुलंद केला आणि त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. कॉम्रेड डांगे हे 1978 पर्यंत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख नेते होते. त्यानंतर काँग्रेस आणि इंदिरा गांधी यांना पाठिंबा देण्याच्या मुद्यावरून भाकपमध्ये पुन्हा वाद निर्माण झाले. 1981 मध्ये त्यांची सीपीआयमधून हकालपट्टी करण्यात आली. ते ऑल इंडिया कम्युनिस्ट पार्टी (AICP) आणि नंतर युनायटेड कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियामध्ये सामील झाले. सीपीआयमधून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी तत्कालीन कम्युनिस्ट चळवळीचे प्रखर विरोधक असलेल्या शिवसेना पक्षाच्या एका शिबिराला मार्गदर्शनही केले होते. झुंजार आयुष्य असलेल्या या मोठ्या नेत्याचा आयुष्याचा उत्तरार्ध काही प्रमाणात दुर्लक्षित झाला.