पाण्याचा खतरा, बुडाले अठरा; गेल्या तीन दिवसात राज्यात 18 जणांना जलसमाधी
Ujani Dam Incident : गेल्या तीन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी वाईट घटना घडल्या असून 18 जणांना जलसमाधी मिळाली आहे.
मुंबई : राज्यात गेल्या तीन दिवसांत वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून 18 जणांचा मृत्यू झालाय. मंगळवारी 21 तारखेला नाशिकच्या इगतपुरीमधील भावली धरणात बुडून पाच जणांचा मृत्यू झाला. तर इंदापूरच्या उजनी धरणात प्रवासी वाहतूक करणारी बोट बुडून सहा जण दगावलेत. गुरूवारी अहमदनगरच्या अकोलेतील प्रवरा नदीत SDRF पथकाची बोट उलटून तिघांचा मृत्यू झाला. पुण्याच्या शिरुर तालुक्यातील पाबळमध्ये शेततळ्यात पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झालाय. तर नाशिकच्या सिन्नर तालुक्यातही दोन चुलत भावांचा बुडून मृत्यू झाला.
नातेवाईकांचा काळीज चिरणारा आक्रोश
अकोलेत देवदूतांवर यमदूताने घाला घातला तर उजनी धरणात बोट बुडून सहाजण मृत्यूमुखी पडले. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांचा काळीज चिरत जाणारा आक्रोश हा सुन्न करणारा होता. गेली दोन दिवस हे नातेवाईक आपला माणूस पाण्यातून सहिसलामत बाहेर येईल या आशेवर होते. मात्र मृतदेह पाण्यावर तरंगले आणि मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला.
त्याचवेळी नाशिकच्या इगतपुरीमध्ये भावली धरणात बुडून पाच जणांचा मृत्यू झाला. मामा आणि भाचे असे मिळून पाचजण भावली धरणावर फिरण्यासाठी गेले होते. तेव्हा पोहताना एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
अहमदनगरच्या अकोलेतील प्रवरा नदीत बुडालेल्यांना वाचवण्यासाठी गेलेली एसडीआरएफची बोट उलटली आणि त्यात तिघांचा मृत्यू झाला.
उन्हाळी सुट्टीला पाबळ येथे मामाच्या गावाला आलेले दोघे भाऊ आजोबांसोबत शेतशिवार गेले असता कडाक्याच्या उन्हामुळे शेतातील शेततळ्यावर पोहायला गेले. यावेळी शेततळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांना तातडीने पाण्यातून बाहेर काढून पाबळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दोघांचाही दुदैवी मृत्यू झाला. दोन भावांच्या मृत्युमळे गावावर शोककळा पसरली. आर्यन आणि आयुष नवले वय 13 अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या भावांची नावे आहे.
सिन्नरमध्येही दोन चुलत भावांना जलसमाधी मिळालीय. कुंदेवाडी येथे नदीवरील बंधाऱ्यात अमित जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांचा मृत्यू झाला.
एकूणच, महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांत 18 जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे पोहायला किंवा फिरायला जाताना योग्य ती काळजी घेण्याची गरज निर्माण झालीय.
ही बातमी वाचा: