Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके
Majha Special : गेली दोन दिवस झरे आणि कुगाव ग्रामस्थ विविध माध्यमातून शोध मोहिमेच्या मदतीसाठी धावत होते, त्या गावांत चुली देखील पेटल्या नव्हत्या.
पुणे: उजनी जलाशयात दोन दिवसापूर्वी प्रवासी वाहतूक करणारी बोट बुडाली आणि गेली सुरु असलेली शोध मोहीम तिसऱ्या दिवशी सकाळी संपली. या ठिकाणी बुडालेल्या सर्व सहा जणांचे मृतदेह हाती लागले असून त्यामुळे झरे आणि कुगाव या गावात फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके दिसत आहेत.
मंगळवारी संध्याकाळी कुगाव ते काळाशी या उजनी जलाशयातील जलवाहतूक करणारी बोट माढ्यातच गेल्यावर आलेल्या वादळात बुडाली. या बोटीत सात जण प्रवास करत होते. मात्र वादळाने बोट बुडू लागताच राहुल डोंगरे या पोलीस अधिकाऱ्याने पाण्यात उडी मारून पोहत कळाशीचा काठ गाठला आणि ग्रामस्थांना याची माहिती दिली. त्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून या शोध मोहिमेला सुरुवात झाली होती. बुधवारी सकाळी एनडीआरएफची टीम दाखल झाली आणि युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू झाली. मात्र बुधवारी संध्याकाळी तपास काम थांबवताना हाती एकही मृतदेह लागला नव्हता.
गुरूवारी सकाळी पुन्हा नव्या दमाने एनडीआरएफची टीम आणि स्थानिक मच्छीमारांनी शोधला सुरुवात करताच पहिल्यांदा लहान मुलाचा मृतदेह फुगूनवर आल्याचे दिसून आले. यानंतर कुगक तिराकडील इनामदार वाड्याच्या जवळ एका पाठोपाठ पाच मृतदेह टीमला हाती लागले. यामध्ये झरे येथील झांधव कुटुंबातील गोकुळ जाधव, त्यांची पत्नी कोमल, दीड वर्षाचा मुलगा शुभम व सहा महिन्याची मुलगी माही यांचे मृतदेह मिळाले.
त्याच्या जवळच बोट चालक अनुराग अवघडे याचा मृतदेह सापडला. मात्र शेवटचा गौरव डोंगरे याचा मृतदेह सापडला नव्हता. पुन्हा गौरवच शोध घेताना दोन तासांनी थोड्या लांब अंतरावर गौरव डोंगरे हा शेवटचा मृतदेह देखील सापडला. प्रशासनाने सुगाव काठाला पाच ऍम्ब्युलन्सची व्यवस्था करून ठेवली होती. हे सर्व मृतदेह काठावर आणताच तातडीने त्यांना ऍम्ब्युलन्समधून करमाळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
मृतदेह सापडल्याची बातमी करमाळा येथे पोचताच मोठ्या संख्येने मृतांचे नातेवाईक उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. आणलेले मृतदेह तातडीने शवविच्छेदनासाठी घेण्यात आले. दोन दिवसानंतर मृतदेह सापडल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून करमाळा प्रांताधिकारी आणि तहसीलदार या सर्व प्रक्रिया सुरु असताना उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित होत्या.
मृतदेह शवविच्छेदनासाठी नेल्याची माहिती कुगाव व झरे या दोन गावात समजल्यावर गावात शोककळा पसरली. गेली दोन दिवस झरे व कुगाव ग्रामस्थ विविध माध्यमातून शोध मोहिमेच्या मदतीसाठी धावत होते. काल दिवसभरात या दोन्ही गावात चुली देखील पेटल्या नव्हत्या. प्रत्येकाला आशा होती मात्र आज सकाळी मृतदेह हाती लागल्याची खबर येताच सर्वांचाच धीर सुटला. गोकुळ जाधव यांचे संपूर्ण कुटुंब यात मृत्यू पावल्याने झरे गावात आज सकाळीपासून शेकडो ग्रामस्थ गोकुळ जाधव यांच्या घराजवळ जमा झाले होते.
सर्वत्र फक्त आक्रोशाची आवाज आणि सुन्न करणारे हुंदके असे वातावरण बनले होते. झरे येथील गोकुळ जाधव हे प्लम्बिंगचे काम करीत असत . अतिशय मनमिळावू असल्याने जाधव यांनी खूप लोके जोडली होती. मंगळवारी गोकुळ जाधव हे आपले काम संपवून इंदापूर तालुक्यातील कळाशीकडे आपल्या पाहुण्याच्या कार्यक्रमासाठी पाच वाजता कुटुंबासह कुगाव किनारी पोचले होते. बोट यायला वेळ लागल्याने साडेपाचच्या दरम्यान गोकुळ जाधव त्यांची पत्नी कोमल व दोन लहान मुले शुभम व माही याना घेऊन कळाशी कडे निघाले होते .
या घटनेत प्रशासनाने या बेकायदा जलवाहतुकीवर निर्बंध आणून जर सुरक्षेच्या सुविधा द्यायला लावल्या असत्या तर एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला नसता अशी संतप्त भूमिका गोकुळ जाधव यांचे नातेवाईक व ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण जाधव कुटुंब उद्ध्वस्त झाले असून घरातील कमावता माणूस गेल्याने त्यांच्या वृद्ध आईबापांचे कसे होणार असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. तातडीने जाधव कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जलवाहतूक सुरु ठेवायची असेल तर शासनाने या बोटीवर सुरक्षेची साधने दिली पाहिजेत अशी मागणी केली .
आता तरी शासनाला जाग येणार का? एकतर बेकायदा जलवाहतूक तातडीने बंद करा अन्यथा नियमानुसार सर्व सुरक्षा साधने देऊन या वाहतुकीला परवानगी द्यावी.
ही बातमी वाचा: