16 February Headlines : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षा सुनावणी, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; आज दिवसभरात
सलग तिसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी होणार आहे. यासह आज दिवसभरात काही महत्वाच्या घटना घडणार आहेत. याचा थोडक्यात आढावा...
16 February Headlines : सलग तिसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी होणार आहे. महाराष्ट्रातील प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवावं की नाही याबाबत कोर्ट निर्णय घेणार आहे. त्याशिवाय अधिकारी मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना अटक होण्याची शक्यता आहे. तर विद्यापीठातील महाविद्यालयात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आजपासून कामबंद आंदोलन होणार आहे. यासह आज दिवसभरात काही महत्वाच्या घटना घडणार आहेत. याचा थोडक्यात आढावा...
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबद्दल सलग 2 दिवस सुनावणी झाल्यानंतर आता पुन्हा आज सुनावणी होणार आहे. मंगळवारच्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाकडून युक्तिवाद मांडण्यात आला होता. त्यानंतर बुधवारच्या सुनावणीत शिंदे गटाचे वकील हरिश साळवे, नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद मांडला. हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवावं की नाही याबाबत कोर्ट निर्णय घेणार आहे.
हरिश साळवे यांनी 45 मिनिटे युक्तिवाद केला. नबाम रेबिया खटल्याचा निकाल ती या प्रकरणाला लागू करावी अशी मागणी केली. राज्यपालांच्या बाजूने वकिलांनी कोर्टात बाजू मांडली. प्रत्येक सदस्यांचे हक्क आणि अधिकार यांच्याबाबत चर्चा झाली. त्याशिवाय मंगळवारच्या युक्तिवादात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एकमेकांशी चर्चाविनिमय करत होते. आता आज सुप्रीम कोर्टात काय होतेय? याकडे सर्वांचं लक्ष लागलेय.य
अधिकारी मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना अटक होण्याची शक्यता
राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण करण्यात आली आहे. हे प्रकरण आता तापण्याची शक्यता आहे. महेश आहेर यांच्याकडून आव्हाडांच्या कुटुंबियांना मारण्याची ऑडिओ क्लिप वायरल झाल्यानंतर मारहाण करण्यात आली आहे. कळवा भागात एलईडी स्क्रिन हटवल्याच्या कारणावरून मारहाण झाल्याची माहिती मिळाली. या प्रकरणातील संबंधीत कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलाय. त्यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. महेश आहेर पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचं वृत्त आहे.
वंचित-शिवसेना चर्चा -
मुंबई – ठाकरे गट आणि वंचितची आघाडी असताना आता पिंपरी-चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकी वंचित बहुजन आघाडी काय करणार यासंदर्भात दोन्ही गटातील नेत्यांची चर्चा होणार आहे. पिंपरी-चिंचवडच्या पोटनिवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आपली वेगळी भूमिका मांडेल अशी शक्यता आहे. पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडी वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे असे कळते.
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आजपासून कामबंद आंदोलन -
विद्यापीठातील महाविद्यालयात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आजपासून कामबंद आंदोलन होणार आहे. राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच राहणार आहे. उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सुद्धा लेखी आश्वासन मागण्यांसंदर्भात दिले जावे अशी मागणी करण्यात आली आहे.
त्यामुळे आज विद्यापीठात महाविद्यालयात कामबंद आंदोलन सुरू राहणार आहे. बैठकित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना, 58 महिन्याची थकबाकी, 1410 कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, या मागण्या आहेत. .
मुख्यमंत्र्यांचा सिंधुदुर्ग आणि जळगाव दौरा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी 10.30 वाजता जिल्ह्यात पोहचणार आहेत. सकाळी 11 वाजता, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे 17 वे त्रैवार्षिक अधिवेशन आणि शिक्षण परिषद होणार आहे. दुपारी 12 वाजता, वेंगुर्ले बंदर येथील झुलत्या पूलाचा आणि निशांत तलाव टप्पा 2 चा लोकार्पण सोहळा होणार आहे.
त्रिपुरात आज मतदान -
त्रिपुरातील आठ जिल्ह्यात आज विधानसभेसाठी मतदान होणार आहे. धलाई, गोमती, खोवाई, उत्तरी त्रिपुरा, सेपहिजाला, दक्षिण त्रिपुरा, उनाकोटी आणि पश्चिम त्रिपुरा येथील 60 मतदार संघात मतदान होणार आहे. 31 महिलांसह 259 उमेदवार मैदानात उतरले आहेत. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावरही जाणार आहेत. दुपारी 3 वाजता भोकर येथे तापी नदीवरील उंच पुल आणि जोड रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता एनईएस हायस्कूल पटांगण, पारोळा येथे विविध विकास कामांचे भूमीपुजन आणि जाहीर सभा होणार आहे.
पिंपरी – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने पत्रकार परिषद घेणार आहेत, दुपारी 1 वाजता.
दर्गाचा उरूस, 649 वर्षांची परंपरा -
सांगली –हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक असलेल्या मिरज मधील हजरत ख्वाजा शमना मिरासाहेब दर्गाचा उरूस आजपासून सुरू होतोय. यंदाचे 649 वर्ष असून मानाच्या चर्मकार समाजाच्या गलेफ अर्पणा नंतर उरुसाला प्रारंभ होणार आहे.
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. जयंत पाटील हे सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत इस्लामपूर येथील साखर कारखान्यावर शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे आंदोलन -
शिर्डी – गेल्या 22 दिवसापासून राहुरी कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे आंदोलन अद्याप ही सुरू असून राज्य सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दखल घेतली नाही. पुढील 2 दिवसात दखल न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय.
"सिव्हिल सोसायटी"ची बैठक -
- जी 20 राष्ट्र समूहाचे अध्यक्षपद यंदा भारताकडे असून नागपूरसह भारतातील विविध शहरात जी 20 च्या विविध उपसमित्यांच्या बैठका सध्या होतायत. मार्च महिन्यात नागपुरात जी 20 समूहाची "सिव्हिल सोसायटी" या विषयावरील उपसमितीची बैठक होणार आहे. त्यासाठी अनेक परकीय पाहुणे नागपुरात येणार असल्याने सध्या नागपूरातील विविध रस्त्यांवर सौंदर्यीकरण आणि स्वच्छतेचे काम जोरात सुरू आहे. अनेक ठिकाणी एरवी पानाच्या थुंकीने भरलेल्या भिंती सुंदर अशा चित्रकारीने सजवल्या जात आहेत. अनेक ठिकाणी नागपूर दुबई सारखा वाटावा यासाठी पामचे वृक्ष लावले जातायत.
वाशिम – जिल्ह्यात त्रून धान्य जनजागृती मुळे ज्वारी पिक पेऱ्यात वाढ झालीये. जिल्ह्यात 344 हेक्टरवर ज्वारीचा पिक पेरा करण्यात आलाय. त्यामुळे ज्वारीच्या उत्पादनात वाढ होणार असून जनावरांसाठी मुबलक चारा उपलब्ध होणार आहे.
आनंद भीमटे यांचे 'गद्दार' आज पुस्तक रुपात येणार -
चंद्रपूर – झाडीपट्टी रंगभूमीचे प्रख्यात नाट्यलेखक आनंद भीमटे यांचे 'गद्दार' हे नाटक पुस्तक रुपात येत असून आज त्याचे प्रकाशन होणार आहे. प्रसिद्ध सिने अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते शंकरपूर येथे या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या वेळी पद्मश्री परशुराम खुणे हे प्रमुख अतिथी राहणार आहेत. विशेष म्हणजे गद्दार या नाटकात मकरंद अनासपुरे हे स्वतः भूमिका करत असून पुस्तक प्रकाशनानंतर हे नाटक देखील सादर होणार आहे.
गोंदिया – गोंदिया शहराच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मागणी नागरिकांनी केली होती. अखेर शिवजयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती नाशिकहून बनविण्यात आली आहे. या मूर्तीचे आज गोंदिया शहरात आगमन होणार आहे.
भंडारा – शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना घेवून तुमसर - मोहाडी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात गुरुवारी दुपारी मोहाडी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चानंतर तहसील कार्यालयात शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेवून तिथेच मार्ग काढण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे मोर्चा नंतर जनसुनावणी कार्यक्रम होत आहे.
रिपब्लिकन पक्षाचे आंदोलन -
मुंबई – प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत यांचे आदिल खान यांच्या सोबत लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर आदिल खान यांनी अभिनेत्री राखी सावंत यांच्यावर अत्याचार आणि घोर अन्याय केल्याच्या निषेधार्थ, दुपारी 3 वाजता रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ओशिवरा पोलीस ठाणे जोगेश्वरी पश्चिम येथे आरोपी आदिल खान याच्या विरुद्ध तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
कुलाबा–वांद्रे–सीप्झ मेट्रो-3 प्रकरणी आज सुनावणी -
- राज्य सरकारनं कुलाबा–वांद्रे–सीप्झ मेट्रो-3 प्रकल्पाच्या मार्गिकेसाठी उभारण्यात येणारी कारशेड पुन्हा आरे वसाहतीत हलविण्याचे निश्चित केल्यानंतर काही झाडे कापण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरडीएल) ने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. नोव्हेंबर 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने 84 झाडे कापण्यासाठी एमएमआरडीएला परवानगी दिली. मात्र प्रत्यक्षात 177 झाडांची कत्तल करण्यासाठी एमएमआरडीएलने वृक्ष प्राधिकरणाकडे अर्ज केला असून प्राधिकरणाकडूनही नोटीस बजावून सुचना-हरकती मागण्यात आल्या आहेत. त्या जाहीर नोटीसीला पर्यावरणप्रेमी झोरू बाथेना यांनी उच्च न्यायालयान आव्हान दिले आहे, त्यावर आज हायकोर्टात सुनावणी.
- टिव्ही कलाकार तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी सहकलाकार शिझान खानला अटक करण्यात आली आहे. शिझानला सत्र जामीन नाकारल्याच्या निर्णयाला त्यानं हायकोर्टात आव्हान दिलं आहे. त्यावर सुनावणी होईल.
- हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी. नाविद, आबिद आणि साजिद मुश्रीफ यांनी ईडीच्या रेडनंतक पीएमएलए न्यायालयात दाखल केलाय अटकपूर्व जामीन अर्ज. राजकीय हेतून तपासयंत्रणोच्या माध्यमातून अटकेच्या धमक्यांचा वापर केला जात असल्याचा अर्जात उल्लेख.