Maharashtra Weather : राज्यभरात पुन्हा पावसाचं थैमान! मराठवाड्यावरील अस्मानी संकट आणखी गडद होणार, पुढील दोन दिवस धोक्याचे; वाचा पावसाचे सर्व अपडेट्स
Marathwada Weather Update: राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. तर आधीच पुराने हैराण झालेल्या मराठवाड्यासमोरील संकट आता अधिक गडद होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. अशातच आधीच पुराने हैराण झालेल्या मराठवाड्यासमोरील (Marathwada Weather Update) अस्मानी संकट आता अधिक गडद होण्याची शक्यता आहे. कारण हवामान विभागाने (IMD) पुढचे 2 दिवस म्हणजेच, 28 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या दरम्यान राज्यासह मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा (Marathwada Rain) देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रासाठी देखील हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट जरी करण्यात आला आहे. तर तिकडे पुणे शहरात सकाळपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात दहा हजाराहून अधिक क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात देखील अशीच पावसाची स्थिती आहे. (Maharashtra Weather Update)
पुढील दोन दिवस धोक्याचे (IMD On Marathwada Rain)
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज (28 सप्टेंबर 2025) च्या 5.30 वाजता भारतीय प्रमाणवेळेवर आधारित राष्ट्रीय बुलेटिननुसार पश्चिम विदर्भ आणि परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तर पूर्व विदर्भ आणि परिसरात कमी दाबाचा पट्टा गेल्या 6 तासांत 43 किमी प्रतितास वेगाने पश्चिमेकडे सरकला आणि 28 सप्टेंबर 2025च्या 5.30 वाजता भारतीय प्रमाणवेळेवर पश्चिम विदर्भ आणि परिसरात, अक्षांश 20.30° उत्तर आणि रेखांश 77.0° पूर्वेजवळ, अकोला (विदर्भ) पासून 50 किमी दक्षिणेस, औरंगाबाद (मराठवाडा) पासून 180 किमी पूर्व-ईशान्येस, नाशिक (मध्य महाराष्ट्र) पासून 330 किमी पूर्वेस आणि सुरत (गुजरात) पासून 450 किमी पूर्व-आग्नेयेस केंद्रीत झाला. पुढील 12 तासांत तो मराठवाडा आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रातून जवळजवळ पश्चिमेकडे सरकण्याची आणि हळूहळू कमकुवत होऊन एका चांगल्या कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होण्याची शक्यता आहे.
Marathwada Rain Update: मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस
मराठवाड्यात यंदाच्या वर्षी (2025) सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरी 581.7 मिलिमीटरच्या तुलनेत 708.1 मिलिमीटर पाऊस झाला, जो सरासरीच्या 120 टक्क्यांहून अधिक आहे. जालना जिल्ह्यात सरासरी 630.1 मिलिमीटरच्या तुलनेत 771.8 मिलिमीटर पाऊस झाला, जो सरासरीच्या 128 टक्के आहे. बीडमध्ये सरासरी 566 मिलिमीटरच्या तुलनेत 835 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला, जो सरासरीच्या 147.6 टक्के आहे. लातूरमध्ये सरासरी 706 मिलिमीटरच्या तुलनेत 894 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला, जो सरासरीच्या 126.7 टक्के आहे. धाराशिवमध्ये सरासरी 603.1 मिलिमीटरच्या तुलनेत 924.6 मिलिमीटर पाऊस झाला, जो सरासरीच्या 153.3 टक्के आहे. नांदेडमध्ये सरासरी 814.4 मिलिमीटरच्या तुलनेत 1085 मिलिमीटर पाऊस झाला, जो सरासरीच्या 133.2 टक्के आहे. परभणीमध्ये सरासरी 661.3 मिलिमीटरच्या तुलनेत 874 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला, जो सरासरीच्या 114.9 टक्के आहे. हिंगोलीत सरासरी 795.3 मिलिमीटरच्या तुलनेत 1062.8 मिलिमीटर पाऊस झाला, जो सरासरीच्या 133.6 टक्के आहे.
Solapur Floods: सोलापूरमध्ये रेड अलर्ट, अक्कलकोट-वाघदरी रस्ता बंद, जनजीवन विस्कळीत
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अक्कलकोट वाघदरी रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. शिरसी गावाजवळ असलेल्या पुलावर पाणी आल्याने हा रस्ता बंद झाला आहे. आज देखील सोलापूर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. माढा तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले आहेत. दोन दिवस पावसानं विश्रांती घेतल्यानं पाणी शिरलेल्या घरांची साफसफाई करण्यात आली होती. मात्र, पुन्हा पुराचा धोका वाढल्यानं अनेक कुटुंबांवर संसार एका गाडीमध्ये भरून गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे. माढ्यामधील उंदरगाव येथील दत्तात्रय कोळी यांच्या कुटुंबालाही याचा फटका बसला आहे. पूर ओसरला म्हणून कोळी कुटुंब घरामध्ये पोहोचले होते, पण "धान्य सुटलेलं म्हणून फेकून द्यावं लागलं." आता उरलं सुटलं सामान घेऊन हे कुटुंब दुसरीकडे निघाले आहे.
येवल्यातही पावसाचा जोर कायम; पोल्ट्री फॉर्मची भिंत पडून 800 कोंबड्या मृत (Nashik Rain)
नाशिक शहारासह जिल्ह्यातील अनेक भागात रात्रीपासून कुठे मुसळधार तर कुठे संततधार पाऊस सुरू आहे, त्रंबकेश्वर मध्येही रात्रीपासून पाऊस सुरू असल्याने शहाराती रस्त्याने नदी नाल्याचे स्वरुप आले आहे,।शहरांतील मुख्य बाजारपेठ, कुशावर्त तीर्थ परिसरात पहाटे पासुनच पाणी असल्यानं धार्मीक विधीसाठी त्रंबकेश्वर नगरीत आलेल्या भाविकांची गैरसोय झाली. सध्या पावसाचा जोर मंदावला आहे, मात्र गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्यानं गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. तर ग्रामीण भागातील रस्त्यावर पाणी।आल्यानं काही ठिकाणी वाहतुकीलाही अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नाशिकच्या येवला तालुक्यातही रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. येवल्यातील विंचूर चौफुलीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटरमध्ये पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले..तर तालुक्यातही पावसाची जोर कायम असल्याने शेतात पाणी साचल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. उंदीरवाडी तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे बल्हेगावात एका पोल्ट्री फॉर्मची भिंत कोसळून सुमारे 800 च्यावर कोंबड्या मृत पावल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला..तर अनेक घरात पाणी घुसल्याने नागरिकांचे हाल झाले.
ही बातमी वाचा:
























