Marathwada Rain VIDEO : काय सांगावं, सगळंच मातीत गेलं; पुराचं पाणी अन् संसार मोडून पडला, म्हातारा बाबा धाय मोकलून रडला
Solapur Flood : जीव वाचवण्यासाठी अंगावर असलेल्या कपड्यानिशी हे वृद्ध दाम्पत्य बाहेर पडलं. मात्र पुन्हा घरी आल्यानंतर मात्र त्यांना अश्रू आवरता आले नाहीत.

सोलापूर : वर्षभर पाण्यासाठी वणवण करणाऱ्या मराठवाड्याला यंदा पावसाने (Marathwada Rain) असं झोडपलं की अनेकांचा संसार मोडून पडला. दोन दिवसात झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील बहुतांश भागात पूरमय परिस्थिती झाली. लगतच्या सोलापूरमधील (Solapur Rain) दृष्येही मन सुन्न करणारी आहेत. शेती उद्ध्वस्त झाली, घरात चिखल झाला असंच चित्र सर्वत्र पाहायला मिळालं. निमगावात एका वृद्ध दाम्पत्याच्या घरातही पाणी शिरलं आणि मोठं नुकसान झालं. घरभर पाणी, धान्य वाहून गेलं, सिलेंड समोर तरंगतोय... हे दृष्य डोळ्याने पाहताना म्हातारा बाबा धाय मोकलून रडताना दिसला.
सोलपुरातील निमगाव येथील 65 वर्षीय शेतकरी भारत गोवर्धन शिंदे आणि त्यांची पत्नी कौशल्या भारत शिंदे. दोन एकर शेतीवर त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची लग्नं केली आणि आपला घराचा गाडा ते हाकत आहेत. मात्र मंगळवारी, निमगाव गावात जे गेल्या 50 वर्षांत घडलं नाही ते घडलं.
सीना नदीला आलेल्या पुरामुळे आख्ख्या घरात कमरे इतकं पाणी शिरलं. त्यामुळे वयोवृद्ध शिंदे दाम्पत्य जीव वाचून घराच्या बाहेर पडले. दुसऱ्या दिवशी ते घरात गेले तेव्हा घरात होत्याच नव्हतं झालं. घरातील संपूर्ण साहित्य पाण्याने मातीमोल झालं. हे पाहून वयोवृद्ध दाम्पत्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा सुरू झाल्या.
Solapur Nimgaon Flood : काय सांगावं, सगळंच मातीत गेलं
झालेल्या नुकसानीवर बोलताना कौशल्या शिंदे म्हणाल्या की, "अंगावर असलेले कपडे आणि पांघरून घेऊन बाहेर पडलो. मुलंही घरी नसल्याने आम्हाला जास्त काही करता आलं नाही. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी बाहेर पडलो. आम्हाला काहीच अंदाज नव्हता. गेल्या पन्नास वर्षात कधीही पाणी आलं नाही."
झालेल्या नुकसानीवर बोलताना भारत शिंदे म्हणाले की, काय सांगावं, सगळं मातीत गेलं. सगळं धान्य वाहून गेलं. मी पायाने मोडलेलो आणि कंबरेत अधू आहे. अचानक पाणी आल्याने काहीच समजलं नाही.
Solapur Flood : सरकारकडून मदतीची अपेक्षा
भारत शिंदे यांना दोन मुलं आहेत. त्यांची लग्नं झाली असून सध्या दोन्ही मुलं पुण्यातील कंपनीत काम करतात. भारत शिंदे या वयातही शेती करत आहेत. सध्या शेतात ऊस लागवड केली आहे. पण सगळी शेती पाण्याने खरडून गेली. आता ही नुकसान भरपाई कशी भरून निघेल हा प्रश्न त्यांना सतावत आहे.
शिंदे यांच्या घरभर पाणी झालं आहे. त्यांच्या घरातील एकही साहित्य असं नाही की जे भिजलं नाही. आता सरकारने काहीतरी मदत करावी अशी अपेक्षा त्यांना आहे.
Solapur Rain Update : सोलापुरात हाहाकार
सोलापूर जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणी पुराचं पाणी घरात आणि शेतात शिरल्याने अतोनात नुकसान झालं आहे. बुधवारी मुख्यमंत्री यांनी निमगाव या गावी भेट देऊन नुकसानाची पाहणी केली. या गावात 50 ते 60 जणांच्या घरात पुराचं पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले. तर दुसरीकडे शेतीचं प्रचंड नुकसान झाले. आता हे नुकसान कसं भरून निघेल असा सवाल या ग्रामस्थांना पडला आहे.
























