मंदिरं खुली करण्यासंदर्भात सरकारची तयारी सुरु, देवस्थानांकडून आराखडा मागवण्याचा विचार
राज्यात कोरोनामुळं बंद असलेली मंदिरं सुरु करण्यासंदर्भात गृह विभागाची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. काही महिन्यांपासून बंद असलेली मंदिरं खुली करावीत यासाठी भाजप, वंचितसह काही संघटनांच्या आंदोलनानंतर सरकार मंदिरं खुली करण्याच्या तयारीत आहे.
मुंबई : राज्यात कोरोनामुळं बंद असलेली मंदिरं सुरु करण्यासंदर्भात गृह विभागाची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. काही महिन्यांपासून बंद असलेली मंदिरं खुली करावीत यासाठी भाजप, वंचितसह काही संघटनांच्या आंदोलनानंतर सरकार मंदिरं खुली करण्याच्या तयारीत आहे. कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत झालेल्या चर्चेच्या आधारावर राज्य शासनाच्या गृह विभागाने तयारी सुरु केलीय.
राज्यातील महत्वाच्या देवस्थानांकडून मंदिरं खुली करण्यासंदर्भात आराखडा मागवण्याचा विचार असल्याची देखील माहिती आहे. शिर्डी साई संस्थान, सिद्धिविनायक मंदिर न्यास, पंढरपूर विठ्ठल मंदिर संस्थान अशा प्रत्येक देवस्थानांच्या भौगोलिक परिस्थितीनुसार नियमावली बनवण्याचा प्रस्ताव आहे.
भाविकांच्या गर्दीचे नियोजन, स्वच्छतागृह, प्रसादालाय, पूजा-अर्चा-अभिषेक अशा विधींबाबत घ्यायची काळजी या बाबींचा आराखड्यात समावेश असणार आहे. त्या आधारावर प्रत्येक देवस्थानासाठी स्वतंत्र SOP बनणार आहे.
मंदिरं उघडण्याबाबत सरकारला इतका आकस का?, राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
सिद्धिविनायक मंदिरात होणार AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्याची माहिती आहे. शरीराचे तापमान, तोंडावरचा मास्क किंवा दोन व्यक्तींमधील अंतर डिटेक्ट करण्याऱ्या अद्ययावत यंत्रणा / मशिन्सचा वापर होणार आहे. येत्या काही दिवसात याचा आढावा घेऊन मंदिरं खुली करण्यासंदर्भात निर्णय होणार आहे.
'मंदिरं खुली होणार, आठ दिवसात नियमावली, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन' : प्रकाश आंबेडकर
वंचितचं पंढरपुरात आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात पंढरपुरात मंदिर खुलं करण्यासाठी 31 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावेळी सरकार नियमावली तयार करणार असं मला मुख्यमंत्र्यांकडून आंबेडकर यांना सांगितलं होतं. 10 दिवसात आदेश आले नाही तर पुन्हा पंढरपुरात येणार असल्याचं देखील आंबेडकर म्हणाले होते.
मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे? - राज ठाकरे सध्या महाविकास आघाडी सरकारचं काही बाबतीतील धोरणशैथिल्य हे फारच बुचकळ्यात टाकणारं आहे. ह्या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे की ज्यामुळे गेले अनेक दिवस श्रद्धाळू हिंदू भाविकांचा सुरु असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाहीये? ह्या सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित केला होता.
दार उघड उद्धवा! उद्धव ठाकरे तुमचा देवावर विश्वास नाही का?चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
भाजपचं राज्यभर घंटानाद आंदोलन भारतीय जनता पक्षातर्फे राज्यात विविध ठिकाणी मंदिराबाहेर घंटानाद करण्यात आला होता. सरकारला जाग यावी या करिता हे आंदोलन करण्यात आले तसेच वारकरी संप्रदायाकडून देखील या बाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. एकीकडे सरकार मद्य विक्री केंद्रासाठी मुभा देत आहे. मात्र, मंदिरे का उघडत नाही? असा सवाल भाजपकडून करण्यात आला होता.