Chhagan Bhujbal : सुहास कांदेंकडून समीर भुजबळांच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ, छगन भुजबळांनी डागली तोफ; म्हणाले, भयमुक्त नांदगाव...
Chhagan Bhujbal on Suhas Kande : समीर भुजबळांच्या सभेत भाषण करणाऱ्या कार्यकर्त्याला सुहास कांदेंनी शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय. यामुळे नांदगावमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.
नाशिक : नांदगाव विधानसभा मतदारसंघात (Nandgaon Assembly Constituency) गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन नांदगावमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, काल झालेल्या समीर भुजबळ यांच्या सभेत नांदगांव लोकशाही धडक मोर्चाचे पदाधिकारी शेखर पगार यांनी आमदार सुहास कांदे हे दहशत पसरवित दादागिरी करत असल्याचा आरोप केला. समीर भुजबळांच्या सभेतच शिवीगाळाची कॉल रेकॉर्डिंग उपस्थितांना ऐकवण्यात आली. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे समन्वयक विनोद शेलार यांच्यावर सुहास कांदे संतापल्याचे दिसून आले. आता यावरून राष्ट्रवादी अजित गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सुहास कांदेंवर निशाणा साधलाय.
छगन भुजबळ म्हणाले की, मी काही तिथे गेलो नव्हतो. तो अपक्ष उभा राहिलेला आहे. समीरने फॉर्म भरला आहे. काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. सुहास कांदे शिवीगाळ करत आहे असे त्या व्हिडिओमधून दिसून येत आहे. शेखर पगार यांनी भाषण केल्यावर सुहास कांदेंनी तिकडून शिवीगाळ सुरू केली. पगार हुशार होते त्यांनी माईक समोर मोबाईल धरला. सगळ्या नांदगावमध्ये स्पीकर लावले होते. घाणेरड्या शिव्या आणि दमबाजी दिसून आली.
म्हणूनच समीरने भयमुक्त नांदगाव टॅगलाईन घेतलीय
तसेच, विनोद शेलार आणि समीर भुजबळ यांना शिव्या देण्यात आल्या. म्हणूनच भयमुक्त नांदगाव ही टॅगलाईन समीरने घेतली आहे. या क्लिप ऐकल्या तर का घेतली आहे हे सर्वांना समजेल. सामान्य जनता बोलू शकणार नाही असे आहे. पोलिसांनी आणि महसूल विभागाने कारवाई करायला पाहिजे. अधिकारी प्रेशर खाली काम करत आहे. निवडणूक आयोगाने लक्ष दिले पाहिजे. योग्य ती कारवाई केली पाहिजे. लोकांना भयमुक्त वातावरणात मतदान करू दिले पाहिजे. निवडणूक आयोगाने भेदभाव करता कामा नये, योग्य असेल तेच करावे.
कांदेंनी विकास नव्हे केवळ भीती दाखवली
इतर पक्षातील लोकांना, कार्यकर्त्यांना भीती दाखवली जात आहे. ते सगळे समीरला मदत करतील. त्यांनी विकास केला नाही, केवळ भीती दाखवली आहे. मी 10 ते 12 वर्षे नाशिकचा पालकमंत्री होतो, कुणाला भीती दाखवली? समीर 5 वर्ष खासदार होता, कोणाला भीती दाखवली. आम्ही कुणाच्या जमिनी घेतल्या नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांना कांदेंनी पाहिले नाही, समीर तर बाळासाहेबांच्या जवळ खेळला आहे. समीर भुजबळ स्थानिक प्रश्न मांडत आहे कोणताही नेता, अथवा पक्षाबाबत समीर बोलला नाही, असे म्हणत छगन भुजबळ यांनी सुहास कांदे यांच्यावर हल्लाबोल केला.
आणखी वाचा