Sameer Bhujbal : ...म्हणून मी नांदगाव मतदारसंघात आलोय, समीर भुजबळांनी सांगितलं सुहास कांदेंविरोधात अपक्ष लढण्याचं कारण
Sameer Bhujbal vs Suhas Kande : माजी खासदार समीर भुजबळ यांनी सुहास कांदे यांच्या विरोधात नांदगाव विधानसभा मतदारसंघात शड्डू ठोकला आहे.
नाशिक : नांदगाव विधानसभा मतदारसंघात (Nandgaon Assembly Constituency) गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन नांदगावमधून विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. समीर भुजबळ हे नांदगावमधून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर समीर भुजबळ यांनी निवडणुकीत उतरण्याचे कारण सांगितले आहे.
समीर भुजबळ म्हणाले की, भयमुक्त नांदगाव अशा दिवाळीच्या शुभेच्छा. भयमुक्त नांदगावसाठी नांदगावकरांनी मागणी केली. आमच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली. गाव भयमुक्त करायचे आहे, असे सांगितले. नांदगावचा विकास खुटला आहे, प्रगती झालेली नाही. राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा देवून आज उमेदवारी अर्ज भरला आहे. नांदगावमध्ये कार्यकर्त्यांना धमकी दिले जाते. या मतदारसंघातील दहशत कमी करण्यासाठी मी या मतदारसंघात आलो आहे, असे म्हणत समीर भुजबळ यांनी निवडणूक लढवण्याचं कारण सांगितलं आहे.
नांदगावात विकासच झालेला नाही
ते पुढे म्हणाले की, विकासाची गंगा नांदगावमध्ये आली पाहिजे. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या दृष्टीने प्रयत्न केले. मात्र नांदगावात विकासच झालेला नाही. या नांदगावमध्ये पाणी, हॉस्पिटल, शिक्षण काहीच नाही. महिला व आदिवासी बांधव यांना कुठलीच सोय नाही. भुजबळ साहेबांच्या आशीर्वादाने पंकज भुजबळ यांच्या माध्यमातून आपण काम केले आहे. माणसे जोडण्याचे काम आपण केले आहे. येवला, नाशिक, नांदगावमधून अनेक विकास कामे केली आहेत. जनतेत सुख-शांती राहिली पाहिजे, अशी आमची संकल्पना आहे. मंत्री भुजबळ साहेबांचा आशीर्वाद आपल्यासोबत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य
समीर भुजबळ यांच्या भूमिकेबाबत छगन भुजबळ म्हणाले की, महायुतीचे सर्व पक्ष हे समीर भुजबळ यांनाच साथ देतील. आज त्यांच्या रॅलीत जेवढी गर्दी आहे तेवढीच मतांच्या मतपेटीत तुम्हाला पाहायला मिळेल. महायुतीचा विषय आणि नांदगाव विधानसभेचा विषय वेगळा आहे. त्यामुळे महायुतीतील सर्व घटक पक्ष समीर भुजबळ यांचे काम करणार आहेत. कारण सध्या नांदगाव भीतीच्या छायेखाली आहे. अवैध धंदे तिथं आहेत. हे सगळं बंद करायचं आहे. त्यामुळे समीर भुजबळ यांना सर्वजण मदत करणार, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यामुळे सुहास कांदे यांच्या अडचणी वाढणार असल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
आणखी वाचा