एक्स्प्लोर
आईपासून दुरावला 21 दिवसाचा बछडा, संजय गांधी नॅशनल पार्क टीम करतेय पोटच्या मुलासारखा सांभाळ
जेव्हा मिळाला तेव्हा साडे तीनशे ग्रॅम वजन असलेल्या या बछड्याचं वजन आता केवळ एक किलो इतकं झालंय. या बछड्याला कोणतेही इन्फेक्शन किंवा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खास सोयीसुविधा पुरविण्यात आल्या असून खास त्याची काळजी घेतली जात आहे.
मुंबई : अवघ्या 21 दिवसाच्या बिबट्याच्या बछड्याला जीवनदान मिळावं यासाठी संजय गांधी नॅशनल पार्कची रेस्क्यू टीम रात्रंदिवस एक करत आहे. चार डिसेंबरला ठाण्यातील येऊर जंगलात आपल्या आईपासून दूर गेलेला हा 4 दिवसाचा बछडा संजय गांधी नेशनल पार्क टीमला मिळाला. आज हा बछडा 21 दिवसाचा झाला असून त्याला सर्व सोयीसुविधा, त्याच्या गरजा अगदी पोटच्या पोराप्रमाणे ही रेस्क्यू टीम पुरवत आहे. संजय गांधी नेशनल पार्कच्या रेस्ट हाऊसमध्ये अतिदक्षता खोलीत या बछड्याला निगरानी खाली ठेवण्यात आलं आहे.
चार डिसेंबरला आईपासून दूर गेलेल्या बछड्याला पुन्हा एकदा त्याची शोधून देण्यासाठी ही टीम रात्रंदिवस येऊरच्या जंगलात प्रयत्न करत होती. मात्र तीन दिवस अगदी सर्व सीसीटीव्ही कॅमेरे ट्रॅप करून देखील आई आणि बछड्याचं मिलन होऊ न शकल्याने याच्या संगोपनाची जबाबदारी या रेस्क्यू टीमने घेतली. यामध्ये डॉक्टर शैलेश पेठेसह इतर 5 ते 6 जण या नाजूक अवस्थेत असलेल्या बछड्याला वाचविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. जेव्हा मिळाला तेव्हा साडे तीनशे ग्रॅम वजन असलेल्या या बछड्याचं वजन आता केवळ एक किलो इतकं झालंय.
या बछड्याला कोणतेही इन्फेक्शन किंवा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खास सोयीसुविधा पुरविण्यात आल्या असून खास त्याची काळजी घेतली जात आहे. यासाठी ज्या अतिदक्षता खोलीत त्याला ठेवण्यात आलं आहे. त्या ठिकाणी थंडीपासून त्याचा बचाव व्हावा यासाठी खोलीत हिटर लावण्यात आलं आहे. इतकंच नाही तर बछडाला वूलन कपड्यामध्ये ठेवण्यात आलं आहे. त्याला 6 ते 7 वेळेस दूध पाजवून त्याची योग्य देखभाल केली जात आहे. त्यामुळे आईची ऊब आणि दूध जरी या बछड्याला मिळत नसेल तरी सुद्धा याचं संगोपण करण्यासाठी ही टीम सर्व प्रयत्न करत आहे.
आईपासून काही दिवसात दूर झालेल्या या बछड्याला सांभाळणं खूप कठीण असून असे बछडे योग्य संगोपन न केल्यास 30 टक्केच जिवंत राहण्याची आशा असते. त्यात हा बिबट्या जिंवत रहावा यासाठी डॉक्टर पेठे यांच्या मार्गदर्शनखाली आम्ही सगळे काम करत असल्याचं वन परिक्षेत्र अधिकारी विजय बारब्दे यांनी सांगितलं. शिवाय हा बछडा तीन महिन्यांच्या होईपर्यंत आम्हाला त्याची अशीच काळजी घ्यावी लागणार असल्याचं या टीमनं सांगितलं. त्यामुळे मुक्या प्राण्यांवर आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे ही टीम या बछड्याला जगवताना पाहायला मिळत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement