Santosh Deshmukh Case: धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर कठोर कारवाईची मागणी, धनंजय मुंडेही गोत्यात. धनंजय मुंडे यांच्यासोबत पंकजा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी
लातूर: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन राज्यभरातील वातावरण प्रचंड तापले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळावीर लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे सकल मराठा समाजाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यामुळे लातूर-परभणी रोडवरील वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळे रेणापूर येथे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. याठिकाणी मराठा समाज चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळाला. सध्या रेणापूरमध्ये चक्काजाम आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली असून रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेणापूरमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
यावेळी मोर्चेकऱ्यांनी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय द्या, अशी मागणी केली. जिल्हाभरात चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आला आहे... लातूर शहरातील पाच नंबर चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, छत्रपती संभाजी राजे चौक, रेनापुर शहरातील रेनापुर नाका, बोरगाव काळे, लातूर नांदेड रस्त्यावरील चाकूर येथे ही चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आला आहे. उदगीर अहमदपूर तालुक्यातील अनेक भागात चक्का जाम आंदोलन सुरू आहे.
लातूर बार्शी रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट करणारे तात्काळ फासावर लटकवा. मंत्री धनजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत त्यांचा राजीनामा घ्यावा. संतोष देशमुख यांच्या परिवारास आर्थिक मदत करावी . शासकीय नोकरीत सामावून घेतले जावे. यासाठी आज चक्का जाम आंदोलन करण्यात आले आहे. लातूर बार्शी रस्त्यावरील बोरगाव काळे येथे रस्ता रोको आणि चक्का जाम आंदोलन करण्यात आले आहे. याचा परिणाम वाहतुकीवर पाहायला मिळत आहे.
संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला केज तालुक्यात हत्या करण्यात आली होती. त्यांना निर्घृणपणे ठार मारण्यात आले होते. त्यांच्या अंगावर मारहाणीच्या अनेक खुणा होत्या. लोखंडी रॉडचे अनेक फटके मारल्यामुळे संतोष देशमुख यांच्या अंगातील जवळपास सर्व रक्त साकळले होते. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर मराठवाड्यासह राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. सध्या सीआयडी आणि एसआयटी संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास करत आहे. आतापर्यंत धनंजय मुंडे यांचे निकवर्तीय वाल्मिक कराड यांच्यासह आणखी काही जणांना अटक करण्यात आली आहे. या सगळ्यांवर मकोका कायद्यातंर्गत कठोर कारवाई करण्याच्या हालचाली सुरु आहेत.
आणखी वाचा
करुणा शर्मांची पुढची चाल, धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात, थेट हायकोर्टात धाव!