लातूर जिल्ह्यात 4 थ्या दिवशीही अवकाळीचं थैमान; गाय-म्हैस अन् 600 कोंबड्या दगावल्या; शेतातली पिकं झोपली
शेतात वीज पडल्यामुळे दोन म्हशी आणि एका गाईचा मृत्यू झाला आहे, तर एक म्हैस जबर जखमी आहे.जोरदार वाऱ्यामध्ये पोल्ट्री फार्मचे पत्रे उडून गेल्याने 600 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे

लातूर : जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने (Rain) आज पुन्हा एकदा हजेरी लावली. लातूर शहर आणि परिसर निलंगा औसा आणि उदगीर तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. उदगीर भागात जोरदार वारा आणि विजेचा कडकडाटस तुफान पाऊस झाला आहे. मागील 4 दिवसांपासून लातूर (Latur) जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून सातत्याने होणाऱ्या पावसाळे शेतमालाचे मोठे नुकसान होत आहे. पावसापूर्वी जोरदार वारं आणि विजेचा गडगडाट चार दिवसापासून सुरूच आहे. त्यातच, काही ठिकाणी वीज पडून मनुष्यहानी आणि पशू हानी झाल्याचही घटना घडल्या आहेत. तसेच, शेतकऱ्यांच्या फळबागा आणि शेतीमालाचंही नुकसान झाल्याने बळीराजा चिंतेत आहे.
शेतात वीज पडल्यामुळे दोन म्हशी आणि एका गाईचा मृत्यू झाला आहे, तर एक म्हैस जबर जखमी आहे.जोरदार वाऱ्यामध्ये पोल्ट्री फार्मचे पत्रे उडून गेल्याने 600 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. आंब्याच्या भागाचा मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. कडब्याच्या गंजी या पावसात भिजल्याने शेतकऱ्यांना समोर जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उदगीर तालुक्याच्या कल्लूर येथील बाबाराव धोंडीबा शेंडगे यांची म्हैस शेतामध्ये वीज पडून मयत झाली आहे. मौजे बामणी येथे बालाजी वामन घोगरे यांच्या एक गाय आंब्याच्या झाडाखाली बांधलेल्या असताना झाडावर वीज पडल्यामुळे गाय मयत झाली आहे.
म्हैस आणि 600 कोंबड्या मृत्युमुखी
मौजे खेर्डा खू . येथे संग्राम बापूराव राजवाड यांच्या दोन म्हशी झाडाखाली बांधलेल्या असताना झाडावर वीज पडल्यामुळे एक म्हैस मयत झाली. तर दुसरी म्हैस जखमी झाली आहे. मौजे हंगरगा येथे आज दुपारी पाऊस, वारा, वादळ मुळे भागवत केंद्रे यांच्या पोल्ट्री फार्मचं मोठं नुकसान झाला आहे. पोल्ट्री फार्मचे पत्रे उडून गेले आहेत. या पोल्ट्री फार्ममधील 600 कोंबड्या मूर्त अवस्थेत आढळून आल्या आहेत. गोडाऊनमधील शेतमाल त्यात मका आणि कोंबड्याचं खाद्य होतं ते देखील भिजून गेलं आहे.
आंब्याच्या बागेचं नुकसान
उदगीर आणि उदगीरच्या ग्रामीण भागामध्ये केशर आंब्याच्या बागा आहेत. काढणीला आलेले आंबे वादळ वारा आणि पावसामुळे गळून पडले आहेत, हातात तोंडाशी आलेला शेतमाल मातीमोल झाला आहे.
वीज पडून एकाचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात गोविळ येथे अवकाळी पावसात वीज पडून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. झाडाखाली उभ्या असलेल्या दोघा तरुणांवर वीज कोसळली होती, त्यात राजेश चिमाजी जाधव यांचा जागीच मृत्यू झाला तर समीर पवार हे जखमी झाले आहेत.
औंढा नागनाथ तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी आज सायंकाळच्या सुमारास जोरदार स्वरूपाच्या अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी या पावसाचा फटका उन्हाळी ज्वारी भुईमूग यासह भाजीपाला वर्णीय पिकांना बसण्याची शक्यता आहे.























