Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात स्टार्टअप यात्रेचा 26 ऑगस्टपासून शुभारंभ
कोल्हापूर जिल्ह्यात स्टार्टअप यात्रेचा शुभारंभ 26 ऑगस्ट रोजी हातकणंगले तालुक्यातून होणार आहे. 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात समारोप होणार आहे.
Kolhapur News : नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नव उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात स्टार्टअप यात्रेचा शुभारंभ 26 ऑगस्ट रोजी हातकणंगले येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सकाळी ९ वाजता होणार आहे. 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात समारोप होणार आहे.
नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यासाठी आणि आपल्या कल्पनांना उद्योगाची जोड देण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. कौशल्य, रोजगार व उद्योजकता जिल्हा कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय माळी, आयटीआय चे प्राचार्य रवींद्र मुंडासे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पोवार तसेच समिती सदस्य उपस्थित होते.
दरम्यान, 26 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान ही स्टार्टअप यात्रा कोल्हापुरातील प्रत्येक तालुक्याला भेट देऊन प्रचार व प्रसिद्धी करेल. यानंतर 16 सप्टेंबर रोजी नोंदणीकृत लोकांसाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्र घेण्यात येणार आहे. सादरीकरणानंतर 3 विजेत्यांची घोषणा होईल, यातील प्रथम क्रमांकास 25 हजार रुपये, द्वितीय क्रमांकास 15 हजार रुपये व तृतीय क्रमांकास 10 हजार रुपयांचे पारितोषिक दिलं जाणार आहे.
तसेच दहा सर्वोत्कृष्ट संकल्पना राज्यस्तरीय सादरीकरणासाठी पाठवण्यात येतील. ज्यामध्ये कृषी, आरोग्य, शिक्षण, सस्टेनेबिलिटी, ई-प्रशासन, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता व इतर अशा ७ क्षेत्रांमध्ये प्रथम क्रमांकास १ लाख रुपये तर द्वितीय क्रमांकास 75 हजार रुपयांचे बक्षीस मिळेल.
या सोबत राज्यस्तरीय विजेत्यांना इनक्युबेशन सहाय्य, बीज भांडवल, निधीसाठी सहाय्य, नाविन्यता परिसंस्थेतील महत्वाच्या संस्था व तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन सत्रे तसेच सॉफ्टवेअर क्रेडिट्स, क्लाऊड क्रेडिट्स सारखे इतर लाभ ही पुरवण्यात येतील. याव्यतिरिक्त प्रत्येक विभागीय स्तरावर एक सर्वोत्कृष्ट स्टार्ट-अप हिरो व सर्वोत्कृष्ट स्टार्ट-अप महिला निवडली जाईल, ज्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी व सहभाग नोंदविण्यासाठी www.msins.in किंवा www.mahastartupyatra.in वर भेट द्यावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या