Rahul Gandhi In Kolhapur : राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द; बावड्यातील शिवरायांच्या पुतळ्याचे उद्या होणार लोकार्पण
Rahul Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण आणि संविधान सन्मान संमेलनाचे आयोजन काँग्रेसचे परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी केले आहे.
कोल्हापूर : काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आज (ता.4) कोल्हापूरचा नियोजित दौरा रद्द झाला आहे. राहुल गांधी आजपासून कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात येणार होते. या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र, राहुल गांधी यांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आजचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आजचा पुतळा लोकार्पण सोहळा उद्या सकाळी दहा वाजता होणार आहे. उद्या शनिवारी राहुल गांधी यांचे सकाळी साडेआठ वाजता कोल्हापूरमध्ये आगमन होणार आहे. त्यानंतर सकाळी दहा वाजता पुतळ्याचं लोकार्पण पार पडणार आहे.
कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण आणि संविधान सन्मान संमेलनाचे आयोजन काँग्रेसचे परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी केले आहे. देश आणि राज्यातून आलेल्या प्रतिनिधींसमोर पुन्हा एकदा संविधान सन्मान संमेलनात पुन्हा एकदा संविधानाचा मुद्दा मांडण्यावर गांधी यांचा भर असणार आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन करणार
दरम्यान, पुतळ्याचे लोकार्पण पार पडल्यानंतर राहुल गांधी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत. यानंतर संविधान संमेलन कोल्हापूर येथील सयाजी हॉटेलमध्ये होणार आहे. या ठिकाणी ते बाराशे निमंत्रितांसोबत विचार मंथन करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संविधान हा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी राहणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा राहुल गांधी यांनी संविधान बचावचा नारा देत भाजपला आव्हान निर्माण केले होते आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेसला जोरदार यश मिळाले होते. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने सर्वाधिक 13 जागा जिंकत राज्यातील सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. त्याचबरोबर सांगलीचे बंडखोर विशाल पाटील यांनी सुद्धा विजय खेचून आणत काँग्रेसला समर्थन दिले. त्यामुळे राज्यामध्ये आज घडीला सर्वाधिक खासदारांची ताकद काँग्रेसची आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये काँग्रेसकडून सर्वाधिक जागांची मागणी केली जात आहे.
संविधान संमेलनातून कोणती भूमिका घेणार?
या सर्व पार्श्वभूमीवर उद्या राहुल गांधी संविधान संमेलनातून कोणती भूमिका घेत महाराष्ट्राच्या निवडणुकीला सामोरे जाणार याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल. राहुल गांधी यांनी कोल्हापूर निवडण्यामागे सुद्धा रणनीती असल्याचे बोलले जात आहे. छत्रपती शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक म्हणून संबोधले जाते. वंचितांना न्याय देण्याचं सर्वप्रथम काम शाहू महाराजांनीच केलं होतं. त्याच भूमीतून समतेचा नारा पुन्हा एकदा बुलंद करण्यासाठी राहुल गांधी यांनी कोल्हापूरची निवड केल्याचं बोलत जात आहे. त्यामुळे एक प्रकारे याच दौऱ्यातून महाराष्ट्रातील निवडणुकीचे रणशिंग सुद्धा फुंकले जाईल यामध्ये शंका नाही. दरम्यान, राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्याने काँग्रेस नेत्यांची दिगज फौज कोल्हापूरमध्ये आली आहे.
सीमा भागातील नेते सुद्धा आपण या दौऱ्यासाठी तयारी करत आहेत. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोल्हापुरात शाहू नाक्यापासून ते कावळा नाक्यापर्यंत त्यांच्या स्वागतासाठी बॅरिकेड्स लावण्यत आले आहेत. शहरांमध्ये सुद्धा जागोजागी कटआउट्स लावून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या