Kolhapur Chitranagari : कोल्हापूर चित्रनगरीचा सर्वांगीण विकासाचा विस्तृत आराखडा तयार करुन सादर करा; मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांचे निर्देश
चित्रनगरीचा सर्वांगीण विकासाचा विस्तृत आराखडा तयार करुन त्वरित सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी दिले. खारगे यांनी कोल्हापूर चित्रनगरीला भेट दिली.
Kolhapur Chitranagari : कोल्हापूर चित्रनगरी (Kolhapur Chitranagari) प्रशासनाने महसूल वाढीच्या तसेच पर्यटनाच्या दृष्टीने चित्रनगरीच्या एकूण 78 एकर क्षेत्रफळामध्ये 150 x 100 फूट आकाराचा मॅजिक स्टुडिओ, चित्रिकरणाकसाठी एक एकर क्षेत्रफळाचे मोकळे भूखंड, चित्रिकरण स्थळे, पर्यटन स्थळे, 20 खोल्यांची 2 वसतिगृहे यांचा समावेश करुन चित्रनगरीचा सर्वांगीण विकासाचा विस्तृत आराखडा तयार करुन त्वरित सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी दिले. खारगे यांनी कोल्हापूर चित्रनगरीला भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील, रामोजी फिल्म सिटीचे संचालक राजीव जालनापूरकर, प्रकल्प व्यवस्थापक दिलीप भांदिगरे आणि वास्तुविशारद इंद्रजित नागेशकर उपस्थित होते.
खारगे यांनी चित्रनगरी (Kolhapur Chitranagari) येथे उभारण्यात आलेल्या विविध चित्रिकरणस्थळांना तसेच कोल्हापूर चित्रनगरीमध्ये सध्या सुरु असलेल्या "संत गजानन शेगाविचे" आणि "सुंदरी" या सन टीव्हीवरुन प्रसारित होणाऱ्या दैनंदिन मराठी मालिकांच्या सेटवर भेट दिली. त्यावेळी कोल्हापूर चित्रनगरीमध्ये नव्याने तयार करावयाच्या वाडा, चाळ, मंदिर, 100×90 फूट आकाराचा स्टुडिओ, वसतिगृह, रेल्वे स्थानक, बंगला या प्रस्तावित चित्रिकरण स्थळांचा आढावा घेऊन त्यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या.
विकास खारगे यांची छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळास भेट
दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळ (लक्ष्मी विलास पॅलेस कोल्हापूर) येथे भेट देऊन छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यावर आधारीत नियोजित संग्रहालयीन विकासकामांची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. येत्या शंभर दिवसात जन्मस्थळावर राहिलेल्या सर्व कामांच्या संबंधित यंत्रणांना ही कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश खारगे यांनी दिले.
माहिती फलक, डिजिटल माध्यमातून छत्रपती शाहू महाराजांच्या आयुष्यातील ठळक प्रसंगांची ओळख, वेबसाईट, संग्रहालयाच्या लोकार्पण पश्चात त्याचे सुनियोजित दैनंदिन व्यवस्थापन, संग्रहालयाच्या प्रसिद्धीबाबतचा कँपेन, त्याला पर्यटन विभागाशी जोडून त्याचा प्रसार आणि प्रसिद्धी करणे याचा समावेश आहे. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय खात्याचे संचालक तेजस गर्गे, संग्रहालयीन अधिकारी उदय सुर्वे व उत्तम कांबळे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावे
दुसरीकडे, विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेला सामोरे जाताना कॉपीमुक्त परीक्षा द्यावी. आपल्याला गुणवत्तेच्या आधारे पास व्हावयाचे आहे. आपल्या भावी जीवनाचा पाया इयत्ता दहावी आहे, तो मजबूत करा. प्रामाणिकपणे परीक्षा द्या. मनन, पठण, चिंतन करुन अभ्यास करा, अशा सूचना प्रधान सचिव विकास खारगे यांनी इचलकरंजी महानगरपालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूलमध्ये इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांना ‘परीक्षेला सामोरे जाताना’ या विषयावर मार्गदर्शन करताना केल्या.
इतर महत्वाच्या बातम्या