कोल्हापुरात ऊस दरासाठी आंदोलन पेटले; स्वाभिमानी, आंदोलन अंकुशच्या आंदोलनाचा भडका, किसान सभेकडून ऊस दर जाहीर केल्यावरच कारखाने सुरू करण्याची मागणी
कोल्हापूर जिल्ह्यात अजून कोणत्याच कारखान्याकडून 3500 रुपयांवर पहिली उचल जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये संघर्ष चिघळण्याची चिन्हे आहेत.

Kolhapur Sugarcane Farmers Protest: नागपूरमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी बच्चू कडू, राजू शेट्टी यांनी (Raju Shetti Bachchu Kadu news) एल्गार पुकारला असतानाच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊस दरावरून (Kolhapur Sugarcane Farmers Protest) शेतकरी अत्यंत आक्रमक झाले असून आंदोलन पेटले आहे. शिरोळ तालुक्यात आंदोलनाचा भडका उडाला असून या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) आणि आंदोलन अंकुशचे कार्यकर्त्यांकडून उग्र आंदोलन करण्यात येत आहे. स्वाभिमानीकडून यावर्षी गाळप होणाऱ्या ऊसाला पहिली ऊचल 3751 रूपये व गत हंगामातील दुसरा हप्ता एफआरपी अधिक 200 रूपये देण्यात यावे अशी मागणी केली आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात अजून कोणत्याच कारखान्याकडून 3500 रुपयांवर पहिली उचल जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये संघर्ष चिघळण्याची चिन्हे आहेत.
दुसरीकडे, सीमावर्ती परिसरातून ऊसाची कर्नाटकात पळवापळवी होऊ नये, यासाठी राज्य सरकारने कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना गळीत हंगाम सुरू करण्याची मुभा दिली असली, तरी ऊसाच्या दरावर तोडगा न निघाल्याने कारखाने सुरू करण्यास अडचणी येत आहेत. साखरेचे दर वाढले असल्याने शेतकऱ्यांना देखील ऊसाला दर वाढवून मिळावा, अशी जोरदार मागणी होत आहे. या संदर्भात प्रशासकीय पातळीवर कोणतीही बैठक घेतली गेली नाही.
शेतकरी 'उसाच्या चिपाड्यासारखा' झाला
शेतकऱ्यांनी जोपर्यंत पहिली उचल (first installment) जाहीर होत नाही, तोपर्यंत उसाच्या कांड्याला हात लावू देणार नाही, असा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी 10 नोव्हेंबरपर्यंत अल्टिमेटम दिली आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी एफआरपी घोषणा करणे आणि मागील थकीत देणी देणे आवश्यक आहे, परंतु हे पैसे मिळत नसल्यामुळे आंदोलन तीव्र करण्यात आले आहे. ऊस उत्पादक शेतकरी 'उसाच्या चिपाड्यासारखा' झाला आहे, तर कारखानदार मात्र 'साखरेनं भरलेल्या पोत्यासारखं गलेलठ्ठ' झाले आहेत, अशी शेतकऱ्यांची भावना आहे. काही कारखान्यांनी एफआरपी किंवा पहिली उचल जाहीर केली असली तरी, जोपर्यंत चर्चा घडवून एक दर ठरवला जात नाही, तोपर्यंत ती शेतकऱ्यांना मान्य होणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, शिरोळ तालुक्यात शेतकरी संघटनांकडून ऊसाची वाहतूक अडवण्यात येत आहे. काही शेतकऱ्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्यावाहनांच्या टायरीतील हवा सोडून देत आहेत. वाहनांची जाळपोळ सुद्धा केली जात आहे. जर कारखानदारांनी जबरदस्तीने कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न केला, तर त्याची अवस्था काय होईल हे गेल्या दोन दिवसांपासून दिसलं असल्याचे आंदोलक शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.
ऊस दर जाहीर केल्यावरच कारखाने सुरू करा, किसान सभेची मागणी
दरम्यान, अखिल भारतीय किसान सभा आणि ऊस उत्पादक संघर्ष समितीकडून कोल्हापूर जिल्हाधिकारी तसेच साखर सहसंचालक कोल्हापूर विभाग यांना निवेदन देऊन ऊस दर जाहीर करूनच साखर कारखाने सुरू करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली. वाढलेला उत्पादन खर्च आणि कोल्हापूर जिल्ह्यातील उसाचा उतारा पाहता रुपये 4000 प्रति टन इतकी मागणी करण्यात आली.
मागील वर्षीच्या ऊसाला रुपये 200 अंतिम हप्ता देण्यात यावा, शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून केली जाणारी सर्व प्रकारचे कपात रद्द करण्यात यावी, ऊस वाहतुकीचा अवाजवी खर्च कमी करण्यात यावा, तोडणी वाहतूक यंत्रणेकडून शेतकऱ्यांचे होणारे शोषण ताबडतोब थांबवावे, साखर कारखान्यांच्या वजन काट्यांची तपासणी करणाऱ्या भरारी पथकात शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. शिष्टमंडळात डॉ.उदय नारकर,ॲड. अमोल नाईक, कॉम्रेड नारायण गायकवाड, अप्पा परीट, विकास पाटील, दिनकर आदमापुरे, विनायक डंके, दिलीप कांबळे, सुमित पवार यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी होते.
इतर महत्वाच्या बातम्या
























