Kolhapur Municipal Corporation: पिण्याच्या पाण्यापासून ते कचरा कोंडाळ्यापर्यंत समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या कोल्हापूर महापालिकेला कोणी आयुक्त देता का आयुक्त?
पाण्यासाठी वणवण सुरु असतानाच कोल्हापुरात पाणी वाहून जाण्याचेही प्रकार घडत आहेत. प्रशासक असतानाही मनमानी करणारा कर्मचारी वर्ग वालीच कोणी नसताना किती तत्परतेने काम करत असेल हा संशोधनाचा विषय आहे.
Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर शहरात पाणीबाणी सुरु असतानाच तसेच इतरही नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असताना कोल्हापूर महानगरपालिकेला कोणी आयुक्त देता का आयुक्त? अशी म्हणायची वेळ आली आहे. मनपा प्रशासक डाॅ. कादंबरी बलकवडे यांची बदली पुण्यामध्ये 2 जून रोजी झाली आहे. कादंबरी बलकवडे यांची महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरणाच्या महासंचालकपदी (Maharashtra Energy Development Authority) नियुक्ती करण्यात आली आहे. आर. एस. जगताप यांच्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून तब्बल 20 दिवस उलटले, तरी अजूनही कोल्हापूर मनपा आयुक्तपदी नेमणूक झालेली नाही. बलकवडे यांनी कोल्हापूरची जबाबदारी अडीच वर्ष सांभाळली.
कोल्हापूर शहरात रस्त्यांची झालेली दैना, पावसाळ्याच्या तोंडावर केली जाणारी नालेसफाई, मनपा निवडणूक आणि त्यासाठी करावी लागणारी पूर्वतयारी, महापुराचा असलेला वाईट अनुभव, शहरातील नागरी समस्या अशा एक नव्हे गंभीर समस्यांचा डोंगर असतानाच कोल्हापूर मनपाला गेल्या तीन आठवड्यांपासून आयुक्तच नाही, अशी भीषण स्थिती आहे.
कोल्हापुरात नागरी समस्या गंभीर
कोल्हापुरात गेल्या महिनाभरापासून पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. पंचगंगा आणि भोगावती नद्यांनी तळ गाठल्याने शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने टँकर्सची मागणी सुद्धा दिवसागणिक वाढत चालली आहे. त्यामुळे पाण्यासाठी चांगलीच कसरत सुरु आहे. दुसरीकडे, पाण्यासाठी वणवण सुरु असतानाच कोल्हापुरात पाणी वाहून जाण्याचेही प्रकार घडत आहेत. प्रशासक असतानाही मनमानी करणारा कर्मचारी वर्ग वालीच कोणी नसताना किती तत्परतेने काम करत असेल हा संशोधनाचा विषय आहे.
टिप्पर चालकांचा संप, कचरा जाग्यावर
एकीकडे पाणीप्रश्न गंभीर झाला असतानाच मंगळवारी सकाळी कचरा उठाव करणाऱ्यांना टिप्पर चालकांनी पगार न मिळाल्याने काम बंद आंदोलन केले. त्यामुळे कोंडाळा झालेल्या कोल्हापुरातील कचरा जाग्यावरच राहिला. किमान वेतनाचा प्रश्न मार्गी न लागल्यास 24 जूनपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा टिप्पर चालकांनी दिला आहे.
थेट पाईपलाईन टप्प्यात असताना आयुक्तच नाहीत
कोल्हापूर शहरासाठी असलेली थेट पाईपलाईन योजना पूर्णत्वास जात असतानाच कोल्हापूर मनपाकडून कामाचा पाठपुरावा आणि पाहणी करण्यासाठी आयुक्तच नाहीत? अशी स्थिती आहे. कोल्हापूर शहरासाठी काळम्मवाडी धरणातून पाणी देण्यासाठी 53 किमी पाईपलाईन टाकण्यात आली आहे.
कोल्हापूर मनपाची निवडणूक तोंडावर
कोल्हापूर मनपाची मुदत 15 नोव्हेंबर 2020 रोजी संपली आहे. तेव्हापासून कोल्हापूरवर प्रशासकराज सुरु आहे. या कालावधीत तीनदा मनपा निवडणुकीसाठी प्रभाग रचना, आरक्षण, मतदार याद्यांचे पाणी फेरले. मात्र, राज्यातील सत्तांतर, ओबीसी आरक्षण आदी मुद्यांमुळे त्या तयारीवर पाणी फेरले आहे. आता पुन्हा नव्याने प्रक्रिया करूनच पावसाळ्यानंतर मनपा निवडणूक होईल, अशी चिन्हे असतानाच तयारीसाठी आयुक्त नाहीत, अशी स्थिती आहे.
गतीमान शासनाच्या घोषणेला तडा देणाऱ्या खात्याच्या सचिवांची बदली करा
कोल्हापूर मनपाला आयुक्त नसल्याने अॅड. बाबा इंदूलकर यांनी हल्लाबोल करताना हे गतीमान सरकारचे द्योतक असल्याची प्रतिक्रिया दिली. आजच्या आज आयुक्तांची नेमणूक करावी, अशी मागणी त्यांनी एबीपी माझाशी बोलताना केली. गतीमान शासनाच्या घोषणेला तडा देणाऱ्या खात्याच्या सचिवांची बदली करा, कोणता निर्णय किती दिवसात व्हावा याबाबत विचार करण्याची गरज आहे. ज्या सचिवांकडे अधिकार असून कृती केलेली नाही, त्यांची चौकशी करावी, अशी मागणी इंदूलकर यांनी केली.
महापालिका अतिरिक्त आयुक्त पदावर केशव जाधव रुजू
दरम्यान, महाराष्ट्र राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागात अवर सचिव पदावर कार्यरत असलेले केशव जाधव यांची कोल्हापूर महानगपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी रविकांत अडसूळ यांचीही पदोन्नतीने अतिरिक्त आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या