Kolhapur News : सासरच्या दररोजच्या छळाला थकून गेली; तरुण विवाहितेची दीड वर्षाच्या लेकरासह रंकाळ्यात उडी घेत आत्महत्या
Kolhapur Crime : सासरच्या जाचाला कंटाळून अवघ्या 26 वर्षीय विवाहिताने आपल्या दीड वर्षाच्या लेकरासह रंकाळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना कोल्हापुरात (Kolhapur News) घडली.
Kolhapur Crime : सासरच्या जाचाला कंटाळून अवघ्या 26 वर्षीय विवाहिताने आपल्या दीड वर्षाच्या लेकरासह रंकाळ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना कोल्हापुरात (Kolhapur News) घडली. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये आत्महत्यांच्या घटना सलग घडत असून यामुळे समाजमन सुन्न होऊन गेले आहे. रुकसार अनिस निशाणदार (वय 26 वर्षे) आणि उमर अनिस निशाणदार (वय दीड वर्षे दोघेही मूळ रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले, सध्या रा. रंकाळा टॉवर परिसर, कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत. सोमवारी (13 मार्च) दुपारी ही घटना घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी रात्री साडेआठच्या सुमारास दोघांचे मृतदेह रंकाळ्यातून बाहेर काढले.
नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा
या घटनेनंतर रुकसारच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत पती अनिस निशाणदार आणि सासू सायराबानू अन्वर निशाणदार या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका घेतली. याचवेळी सासरकडील काही नातेवाईक मृतदेह स्वीकारण्यासाठी सीपीआरमध्ये आल्याने दोन्ही गटात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
सासरच्या छळाला कंटाळून टोकाचे पाऊल
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार फुलेवाडीमधील रुकसारचा नोव्हेंबर 2021 मध्ये पट्टणकोडोलीमधील अनिस निशाणदारशी विवाह झाला. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने अनिसने एमआयडीसीत एका कंपनीत काम केले. त्यानंतर नोकरी सोडून तो सतत भांडत होता. मद्यप्राशन करुन तो पत्नीला मारहाण करत होता. सासू सायराबानू सुद्धा सुनेला शारीरिक, मानसिक त्रास देत होती. त्यामुळे त्रासाला कंटाळून ती दोन महिन्यांपासून पती आणि दीड वर्षाच्या मुलासोबत रंकाळा टॉवर परिसरातील भाड्याच्या घरात राहत होती.
दोन दिवसांपूर्वी पुन्हा वाद
दोन दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणे पती-पत्नीचा जोरदार वाद झाला होता. त्यानंतर पती अनिस घरातून निघून गेला होता. रविवारी (12 मार्च) रुकसार दीड वर्षाच्या लेकरासह माहेरी फुलेवाडीत आईकडे आली होती. संध्याकाळी ती रंकाळा टॉवर येथील घरी परतली. सोमवारी दुपारपासून तिचा मोबाइल लागत नसल्याने माहेरच्या नातेवाईकांनी शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी रंकाळ्यावरील महादेव मंदिराजवळ तिचे चप्पल आढळले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध घेतल्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास रंकाळ्यात आधी बालकाचा मृतदेह सापडला, तर काही मिनिटांनी रुकसार हिचा मृतदेह हाती लागला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवले. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या