(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्वतंत्र भारताला पहिला गुलाल लावणाऱ्या ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधवांचा पदक स्वीकारतानाचा व्हिडीओ पाहिलात का? अंगावर रोमांच उभे राहतील
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत खाशाबा जाधव यांनी देशाची मान अभिमानाने उंचावली होती. या यादगार क्षणी पदक स्वीकारतानाचा व्हिडीओ Olympic Games च्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे.
Khashaba Jadhav: इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्तता झाल्यानंतर स्वतंत्र भारतासाठी आजच्याच दिवशी बरोबर 71 वर्षापूर्वी कुस्ती खेळात 1952 मध्ये ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून मराठमोळ्या खाशाबा जाधवांनी (K. D. Jadhav) पराक्रमाची गाथा रचली होती. देशाच्या क्रीडा क्षेत्रात तो क्षण मैलाचा दगड ठरावा असाच तो प्रसंग होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत खाशाबा जाधव यांनी देशाची मान अभिमानाने उंचावली होती. या यादगार क्षणी पदक स्वीकारतानाचा व्हिडीओ Olympic Games च्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे.
खाशाबा जाधव पदक स्वीकारताना व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, पहिल्यापैकी पहिले! याच दिवशी 71 वर्षांपूर्वी KD जाधव यांनी स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते म्हणून आपले नाव अभिमानाने कोरले! हा ऐतिहासिक क्षण याची देही याची डोळा व्हिडीओच्या रुपाने का होईना पाहण्यास मिळाल्याने अनेक नेटकऱ्यांनी आभार मानले. पहिल्यांदाच हा क्षण पाहण्यास मिळाल्याची प्रतिक्रियाही काहींनी दिली.
The first of the firsts! 🇮🇳
— Olympic Khel (@OlympicKhel) July 23, 2023
On This Day, 7️⃣1️⃣ years ago, KD Jadhav etched his name in glory as the first individual Olympic medalist from independent India! 🥉#OnThisDay | @WeAreTeamIndia pic.twitter.com/c6aAzEK3jI
मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित
खाशाबा जाधव यांचा जन्म 15 जानेवारी 1926 रोजी मराठा साम्राज्याच्या गौरवशाली क्षणांचा साक्षीदार असलेल्या सातारा जिल्ह्यामधील कराड तालुक्यातील गोळेश्वर खेड्यात झाला. खाशाबा यांचे वडील दादासाहेब जाधव हे सुद्धा ख्यातनाम पैलवान होते. खाशाबा पाच वर्षांचे असल्यापासून त्यांनी कुस्तीचे बाळकडून दिले. केडी (KD) आणि पॉकेट डायनामो या टोपणनावाने देखील खाशाबा जाधव ओळखले जात होते. सन 2000 मध्ये भारत सरकारने खाशाबा यांना कुस्तीमधील त्यांच्या योगदानाबद्दल मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. 2010 च्या दिल्ली कॉमनवेल्थ गेम्ससाठी नव्याने बांधलेल्या कुस्तीस्थळाला त्यांच्या कामगिरीचा सन्मान म्हणून त्यांचे नाव देण्यात आले. 15 जानेवारी 2023 रोजी गुगलने खाशाबा जाधव यांना त्यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त गूगल डूडलद्वारे सन्मानित केले होते. नागराज मंजुळे यांनी खाशाबा यांच्या जीवनावर चित्रपट काढण्याची घोषणा केली आहे.
हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकलं
1948 मध्ये जेव्हा लंडन ऑलिंपिकसाठी फ्लायवेट गटासाठी खाशाबांची निवड झाली तेव्हा ते सहाव्या क्रमांकावर होते. या क्रमांकापर्यंत पोहोचणारे भारतातील ते एकमेव खेळाडू होते. 1952 साली हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी फ्रीस्टाइल कुस्तीत जिंकलेलं कांस्यपदक हे स्वतंत्र भारतासाठी मिळवलेलं पहिलं वैयक्तिक पदक होतं. 1948 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये फ्लायवेट वजन गटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला होता.
1955 मध्ये खाशाबा जाधव पोलिस उपनिरीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलिस दलात रुजू झाले. त्यांनी आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत अनेक कुस्त्या जिंकल्या. त्याचवेळी ते राष्ट्रीय स्तरावर क्रीडा मार्गदर्शक म्हणून काम करू लागले. पोलिस खात्यात 27 वर्षे नोकरी केल्यानंतर ते सहाय्यक पोलिस आयुक्त पदावरून निवृत्त झाले. 1984 मध्ये खाशाबा जाधव यांचे अपघाती निधन झाले. 2001 मध्ये त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
इतर महत्वाच्या बातम्या