Kolhapur Rain : कोल्हापुरात मुसळधार पाऊस, कोकणात जाणारे दोन्ही मार्ग बंद
सध्या कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात देखील तुफान पाऊस कोसळत आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे.
Kolhapur Rain : राज्यात सध्या मुसळधार पावसानं (Rain) थैमान घातलं आहे. या पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला आहे. तर काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. सध्या कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात देखील तुफान पाऊस कोसळत आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, या पावसामुळं कोल्हापुरातून कोकणात जाणारे दोन्ही मार्ग बंद झाले आहेत. वाहतुकीवर परिणाम झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे.
मुसळधार पावसामुळं सकाळी कोल्हापुर जिल्ह्यातून गगनबावडा मार्गे कोकणात जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. लोंगे-किरवे या गावच्या हद्दीत पाणी रस्त्यावर आल्याने ही वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यानंतर आता कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. केर्ली जवळ पाणी आल्याने रत्नागिरीला जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. गगनबावड्या नंतर कोकणात जाणारा दुसरा मार्ग देखील बंद झाला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातला आहे. कोल्हापुरातही पावसाची संततधार सुरु असल्यानं पंचंगगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगेची पातळी 40 फूटांवर गेली आहे. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पंचगंगेनं इशारा पातळी ओलांडली आहे. राधानगरी पाणलोट क्षेत्रासह, आजरा, गगनबावडा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. परिणामी राधानगरी धरणही शंभर टक्के भरलं आहे. त्यामुळं राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. राधानगरी धरणातून भोगावती नदीतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 5 राज्यमार्ग आणि 21 जिल्हा मार्ग बंद
मुसळधार पावसानं गगनबावडा घाटातून कोकणात जाणारी वाहतूक सध्या बंद ठेवण्यात आली आहे. लोंगे किरवे कुंबी नदीचं पाणी रस्त्यावर आल्यानं ही वाहतूक बंद ठेवावी लागत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 5 राज्यमार्ग आणि 21 जिल्हा मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. मुसळधार पावसानं शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षाही पुढे ढकलल्या आहेत. आज आणि उद्या होणाऱ्या परीक्षांची आता नवी तारीख काही दिवसात जाहीर होणार आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्याचबरोबर कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. दरम्यान, येत्या 24 तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर काही ठिकाणी अतीवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Kolhapur Rains : राधानगरी धरण 100 टक्के भरलं, तर पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली
- Maharashtra Rains : कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ