Farmer Caste Query For Buying Fertilizer : शेतकऱ्यांनो पहिल्यांदा 'जात' दाखवा मगच रासायनिक खतं घ्या! केंद्र सरकारच्या तुघलकी फतव्याने संतापाचा कडेलोट
Farmer Caste query for Buying Fertilizer : रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकर्यांना पॉस मशिनवर आपली जात सांगावी लागत आहे. जात विचारून खतं देत असल्याने शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे.
Farmer Caste Query For Buying Fertilizer : कणाकणाने जातीच्या अंताच्या गप्पा सुरु असतानाच केंद्र सरकारने मणामणाने शेतकऱ्यांची जाती गोळा करण्याचा उद्योग सुरु केल्याने संतापाचा कडेलोट सुरु आहे. रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकर्यांना पॉस मशिनवर आपली जात सांगावी लागत आहे. त्यामुळे दुकानदार आता जात विचारुन खतं देत असल्याने शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे. सांगली जिल्ह्यात 6 मार्चपासून शेतकऱ्यांसाठी जातीची अट बंधनकारक करण्यात आली आहे.
पॉस मशीन ही यंत्रणा केंद्र शासनाच्या खत मंत्रालयामार्फत चालविली जाते. त्यामुळे कृषी विभागात देखील या प्रकाराबाबत काही माहिती नसल्याची सध्या माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची जात गोळा करुन आणखी कोणत्या नव्या चक्रव्यूहात अडकवण्याचा उद्योग तरी सुरु झाला नाही ना? अशी शंका उपस्थित झाली आहे. शेतकऱ्यांना आता जात दाखवल्याशिवाय खत मिळणार नाहीत, असा नवा नियम आता लागू करण्यात आला आहे. रासायनिक खत घेताना दुकानदाराकडे "ई पॉस" मशीनवर शेतकऱ्यांना त्यांची जात लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ई-पॉस मशीनमध्ये जातीची विचारणा
गेल्या काही दिवसापासून ई-पॉस मशीन या सॉफ्टवेअर यंत्रणेमध्ये अशा पद्धतीचे अपडेटस् आले आहेत. खत घेताना दुकानदारांकडून जातीची विचारणा होत असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत. रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकर्यांना आपली जात सांगावी लागत असल्याने बळीराजांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शेतकर्यांना दुकानांत खत खरेदीसाठी गेल्यानंतर नाव, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक, पोत्यांची संख्या याची माहिती द्यावी लागते. त्यानंतर पॉस मशिनवर शेतकर्यांना अंगठा घेऊन खत दिले जाते. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपूर्वी ई-पॉस मशीन या सॉप्टवेअर यंत्रणेमध्ये अपडेटस् आले आहेत. यासाठी शेतकर्यांना त्यांची जात विचारण्यात येत आहे.
सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी जातीची अट
यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 6 मार्चपासून सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी जातीची अट बंधनकारक करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना रासायनिक खत खरेदी करताना आता पैशांसोबतच जात सांगावी लागत आहे. खत कंपन्यांना सरकारकडून अनुदान देण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून "ई पॉस" मशीनच्या माध्यमातून स्थानिक दुकानदाराकडून मोबाईल, आधारकार्ड नंबर भरुन खत देण्यात येत होते.
मात्र 6 मार्चपासून या "ई पॉस"मशीन मध्ये अपडेट करण्यात आले आहेत, ज्यामध्ये शेतकऱ्यांना आता पैसे व इतर गोष्टींच्या बरोबर जात लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. जात सांगितल्यानंतर दुकानदाराकडून खत देण्यात असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे विक्री आणि खत दुकानदारांमध्ये वादावादीचे प्रकार देखील घडत असल्याचे समोर येत आहे. यामुळे सरकार आणि कृषी विभागाच्या कारभारावर शेतकरी संताप व्यक्त करत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या