(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Devendra Fadnavis on NCP: राष्ट्रवादी साडेतीन जिल्ह्याचा पक्ष, कर्नाटकात काय डोंबल करणार? हे पार्सल महाराष्ट्रात पाठवा, त्याचे काय करायचं ते पाहतो; फडणवीसांचा हल्लाबोल
राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. इथं काय डोंबल करणार? इथं राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिलिभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचं काय करायचे बघतो, असे फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis on NCP: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सीमाभागातील निपाणीमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. त्यांचा निशाण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस राहिले. निपाणीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार रिंगणात असल्याने फडणवीस यांनी राष्ट्रवादीची संभावना साडेतीन जिल्ह्याचा पक्ष अशी केली. यावेळी बोलताना त्यांनी शशिकला जोल्ले आजच निवडून आल्याचे जाहीर करतो असे फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शशिकला जोल्ले वहिनी कर्नाटकात सगळ्यात जास्त लीडने निवडून येणार आहेत. सभेला झालेली गर्दी पाहिली असता वहिनी आज निवडून आल्या, असे जाहीर करतो. या निवडणुकीत तुमच्या भाग्याचा प्रश्न उपस्थित होणार आहे. माता भगिनींच्या नावाने घर केलं जाणार आहे. पुरुषांच्या नावात घर असणार नाही. माफ करा पुरुषांनो, ते कधी विकून टाकतील याचा नेम नाही, पण भगिनी तसं करत नाहीत. मोदींनी दिलेल्या लसीमुळे आज सगळे जिवंत आहोत, पाकिस्तानचा नेता कटोरा घेऊन निघाला आहे, पण कोणी त्यांना मदत करत नाहीत.
पाकिस्तानात किती महागाई आहे याची कल्पना तुम्हाला आहे का? मात्र, आपली अर्थव्यवस्था गतीने पुढे जात आहे. या मतदारसंघात काही लोक जातीयवादीपणा करत आहेत. काँग्रेसचं तर डोकं फिरलं आहे. त्यांचे नेते म्हणाले हिंदू शब्द अश्लील आहे. तुमचा मेंदू सडला आहे म्हणून तो अश्लील वाटतो.
राष्ट्रवादी काँग्रेस साडेतीन जिल्ह्याचा पक्ष
फडणवीस पुढे म्हणाले की, इथं राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील उमेदवार आहे. मात्र, हा राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय डोंबलं करणार? इथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिलगीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचं काय करायचे बघतो. काँग्रेसला आता राहिलेच नाही अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणीस यांनी हल्लाबोल केला.
गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस सीमावर्ती भागामध्ये भाजप उमेदवारांसाठी प्रचार करत आहेत. मात्र, महाराष्ट्र एकीकरण समितीकडून भाजपवर होत असलेल्या प्रचारामुळे संतप्त भावना व्यक्त होत आहेत. फडणवीस यांचे बेळगावात आगमन झाल्यानंतर त्यांना काळे झेंडे दाखवून धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या होत्या.
शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यातील भाजप नेत्यांचा प्रचार सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात सुरू असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा सीमाभागामध्ये प्रचार करणार होते. मात्र, ठाकरे गटाकडून आणि एकीकरण समितीकडून सुरु असलेल्या आक्रोशामुळे त्यांनी सीमाभागात जाणे टाळले आहे. किनारपट्टी भागांमध्ये एकनाथ शिंदे भाजपसाठी प्रचार करणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या