Sanjay Raut: चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई सीमाभागात फिरकले देखील नाहीत; मराठी माणसांचे गद्दार, दुसरे काय? संजय राऊतांचा कडाडून हल्लाबोल
सीमा समन्वय समितीमधील दोन मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई सीमाभागात फिरकले नसल्याने अत्यंत शेलक्या शब्दात संजय राऊत यांनी ट्विट करून या दोन्ही मंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.
Sanjay Raut: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी शिगेलो पोहोचली आहे. सीमाभागात प्रचारासाठी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील भाजप शिंदे गटाच्या नेत्यांसह राज्य सरकारमधील अनेक मंत्री कर्नाटकमध्ये प्रचारात उतरले आहेत भाजप आणि शिंदे गटाकडून अर्थातच कर्नाटक भाजपसाठी प्रचार केला जात आहे, तर शिवसेना ठाकरे गटाकडून संजय राऊत यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांसाठी प्रचार केला. दरम्यान, सीमाप्रश्न धगधगता असतानाही भाजप नेत्यांकडून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराकडे झालेले दुर्लक्ष तसेच सीमावादावर नेमण्यात आलेले समन्वयक मंत्री सीमाभागात फिरकले नसल्याने खासदार संजय राऊत यांनी कडाडून हल्ला चढवला आहे.
मराठी माणसांचे गद्दार, दुसरे काय?
समन्वय समितीमधील दोन मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई सीमाभागात फिरकले नसल्याने अत्यंत शेलक्या शब्दात संजय राऊत यांनी ट्विट करून या दोन्ही मंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले आहे, की चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची सीमा भागासाठी समन्वयक मंत्री म्हणून नियुक्त केली आहे. या भागातील मराठी जनता आपल्या अस्तित्वाची लढाई एकाकी लढत असताना हे दोन जबाबदार मंत्री सीमा भागात फिरकले देखील नाहीत. इतिहासात त्याची नोंद राहील. Shame!Shame!! मराठी माणसांचे गद्दार.दुसरे काय?
त्यांनी ट्विटसोबत एक फोटोही ट्विट केला असून तो फोटो सुद्धा लक्ष वेधून घेत आहे. त्यामध्ये म्हटले आहे, की हरवले आहेत, मिसिंग. यामध्ये शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांचा फोटो असून त्यामध्ये लिहिले आहे, की सीमा भागात मराठी जनता संयुक्त महाराष्ट्रासाठी एकाकी लढत असताना त्यांना साथ द्यायचे सोडून हे कोणत्या बिळात लपून बसले आहेत हे त्यांचे त्यांनाच ठाऊक.
संजय राऊतांकडून एकीकरण समितीसाठी प्रचार
दरम्यान दोन दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी बेळगाव दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये त्यांनी बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी सभा घेतल्या होत्या. समितीच्या विरोधात प्रचार करत असल्याने त्यांनी भाजपवर कडाडून हल्लाबोल केला होता. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही टीकेला प्रत्युत्तर देत संजय राऊत यांनी काँग्रेसची दलाली करत असल्याची टीका केली होती.
फडवणीसांना दाखवले काळे झेंडे, धिक्काराच्या घोषणा
सीमा भागामध्ये महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांकडून होत असलेल्या भाजप उमेदवारांच्या प्रचारामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीकडून विरोध करण्यात येत आहे. समितीकडून महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांना सीमाभागामध्ये प्रचारासाठी येऊ नये, असे आवाहन करण्यात आलं होतं. मात्र, भाजपकडून एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार करण्यात येत आहे. त्यामुळे समितीच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला देवेंद्र फडणवीस यांना सामोरे जावे लागले आहे. फडणवीस बेळगावमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते. तसेच धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या होत्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा सीमाभागामध्ये प्रचार करणार असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून रंगली आहे. त्यामुळे मराठी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रयत्न नाही ना? अशी भावना त्यांच्या मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांमधून उमटू लागली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या